मुंबई महापालिकेच्या मुख्य पर्यवेक्षकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी गैरव्यवहारप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मुख्य पर्यवेक्षक विजयकुमार कासकर (वय 57) याला बुधवारी (ता. 29) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

मुंबई - मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी गैरव्यवहारप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मुख्य पर्यवेक्षक विजयकुमार कासकर (वय 57) याला बुधवारी (ता. 29) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

महापालिकेच्या "डी' विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात बनावट कागदपत्रांद्वारे 44 जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली होती. या प्रकरणात कासकर सामील असल्याचे उजेडात आले होते. कासकरला 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणात अटक झालेल्या 58 जणांपैकी 13 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

"डी' विभागातील एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी विभाग कार्यालयात खेपा मारत होती. दर खेपेला "फाईल क्‍लीअर' झाली नाही, अमुक विभागात अडकली आहे, अशा प्रकारची उत्तरे तिला मिळत होती. अखेर या महिलेने ग्राहक समाजसेवा संस्थेशी संपर्क साधल्यानंतर संस्थेने डी विभाग कार्यालयात चौकशी केली. त्यातून या महिलेच्या नावावर भलतीच महिला कामावर असल्याचे उघडकीस आले. माहितीच्या अधिकारानुसार मागितलेल्या कागदपत्रांतून, या महिलेच्या नावाने भलत्याच महिलेने मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, तसेच पोलिसांच्या विशेष शाखेचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचे उघडकीस आले होते.

मृत कर्मचाऱ्याच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या नातलगांना नोकरी देण्याऐवजी भलत्यालाच नोकरी देण्याचा हा प्रकार सध्या गाजत आहे. आतापर्यंत असे 44 प्रकार घडल्याची तक्रार ग्राहक समाजसेवा संस्थेचे सहसचिव शिवप्रकाश तिवारी यांनी पोलिसांकडे केली. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या कक्ष-3 कडे सोपवण्यात आले होते.

Web Title: mumbai municipal main supervisor arrested