दूध कशातून विकावे? 

दूध कशातून विकावे? 

मुंबई - गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यामुळे ग्राहकांना दूध पुरवण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध दुग्ध व्यावसायिकांनी सुरू केला आहे. काचेच्या बाटलीतून दूध पुरवण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी का, याचीही चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. 

राज्य सरकारने प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय जाहीर केला असला तरी त्याला पर्याय काय, याबाबतची लेखी माहिती न मिळाल्यामुळे राज्यभरातील सहकारी डेअरीचे संचालक पेचात पडले आहेत. 

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पुढील वर्षी गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. पर्यावरण महामंडळामार्फत फेरीवाले आणि व्यापाऱ्यांना इको फ्रेंडली पिशव्या देण्यात येणार आहेत; मात्र डेअरी उत्पदनांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. प्लास्टिक बंदीची बातमी वाचली; पण त्याबाबत लेखी आदेश आलेले नाहीत, असे आरे डेअरीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

प्लास्टिक पिशव्या बंद झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी नवी यंत्रणा उभारावी लागेल. त्यात वेळ आणि पैसाही खर्च होईल, असे गोकुळ डेअरीचे अध्यक्ष विश्‍वासराव पाटील यांनी सांगितले. सरकारने निर्णय जाहीर केला; परंतु त्याची लेखी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे काय करावे समजत नाही, असेही ते म्हणाले. 

प्लास्टिक पिशवीला पर्याय 
- टेट्रापॅक ः टेट्रापॅकचा वापर सर्रास केला जातो. टेट्रा पॅकमधून दूध विकल्यास त्याचा खर्च लिटरमागे 15 ते 16 रुपयांनी वाढेल. तो ग्राहकांना सोसावा लागेल. 
- काचेच्या बाटल्या ः पूर्वी मुंबईत आरे डेअरीचे दूध काचेच्या बाटल्यांमधून विकले जात होते. या बाटल्यांचा पुनर्वापरही होत होता; मात्र तेव्हा मुंबईतील दुधाची गरज कमी होती. आता ती दिवसाला 50 लाख लिटरहून अधिक आहे. 
- मिल्क वेंडिंग मशीन ः मिल्क वेंडिंग मशीनच्या साह्याने दुधाचे वितरण करता येऊ शकते; मात्र ही यंत्रणा उभारणे किचकट काम आहे. त्यात भेसळही होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com