मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी तहकूब 

उर्मिला देठे
सोमवार, 19 जून 2017

खटल्यादरम्यान, मुंबई पोलिस आणि भारत सरकारने अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला पुर्तगालहून आणि मुस्तफा डोसाला दुबईहून प्रत्यार्पित करण्यात आले आहे.

मुंबई : 1993च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील दोषींच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद उद्यापर्यंत तहकूब करण्यात आला आहे. टाडा न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. त्या  निकालाचा अभ्यास करण्यासाठी तसेच निकालावर अपील करण्यासाठी वेळ हवा आहे, अशी मागणी बचाव पक्षाच्या वकिलांनी अर्जाद्वारे केली होती. विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी या मागणीला विरोध केला. बचाव पक्षाचा हा अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला. 

अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्ला शेख या सहाजणांना दोषी ठरवले आहे. तर कय्यूम शेखला दोषमुक्त केले आहे. या सर्वांवर हत्या, कट रचणे आणि टाडा कायद्याअंतर्गत गुन्हे सिद्ध झाले आहेत.

या प्रकरणात टाडा कोर्टाने आधीच 100 आरोपींना दोषी ठरवले आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फाशीची शिक्षा देण्यात आली. खटल्यादरम्यान, मुंबई पोलिस आणि भारत सरकारने अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला पुर्तगालहून आणि मुस्तफा डोसाला दुबईहून प्रत्यार्पित करण्यात आले आहे.