मुंबईतील 314 पुलांच्या सर्वेक्षणाचा निर्णय हवेतच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरातील 314 पादचारी पुलांचे सर्वेक्षण करून त्यांची सद्यःस्थिती तपासण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय हवेत विरला आहे. महापालिकेने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा निर्णय घेतला होता.

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरातील 314 पादचारी पुलांचे सर्वेक्षण करून त्यांची सद्यःस्थिती तपासण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय हवेत विरला आहे. महापालिकेने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा निर्णय घेतला होता.

महाड पूल दुर्घटनेनंतर शहर व उपनगरातील रेल्वे आणि पालिकेच्या अखत्यारीतील पादचारी पुलांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. आठ महिन्यांत अहवालही सादर करण्यात येणार होता. त्याचबरोबर शहरातील पुलांच्या दुरुस्तीसाठी 63 कोटी 18 लाख रुपये, तर उपनगरासाठी 49 कोटी 39 लाख रुपये खर्च करण्यात येणार होता.

पादचारी पुलांची सद्यस्थिती काय आहे? किती पूल दुरुस्तीच्या स्थितीत आहेत? किती पुलांचे आयुष्यमान संपले आहे? आदी सर्व माहिती अहवालाद्वारे देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते; मात्र स्थायी समितीच्या बैठकीत अजूनपर्यंत पुलांच्या सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 

टिळक ब्रिजची दुरुस्ती केव्हा?
रेल्वेच्या पादचारी पुलाची दुरुस्ती करणे अत्यावश्‍यक आहे. दादरचा टिळक ब्रिज 1925 मध्ये बांधण्यात आला. त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 35 लाख रुपये रेल्वेने मंजूर केले होते; परंतु अजूनही पुलाच्या कामाला सुरवात झाली नसल्याची माहितीही महालकेच्या अधिकाऱ्याने दिली.