एसटी चालकपदासाठी 450 महिलांचे अर्ज

दीपा कदम
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई - गावागावात पोचणाऱ्या एसटी बस गाड्यांचे सारथ्य यापुढे महिलांच्या हातीही येणार आहे. घाटातल्या वळणदार रस्त्यांवरून प्रवाशांनी भरलेली एसटी बसची चालक महिला असेल तर आश्‍चर्य वाटून घेऊ नका. तब्बल 450 महिलांनी एसटी बसेसचे चालक होण्यासाठी अर्ज केला असून, या सर्व महिला परीक्षेत उत्तीर्ण झाल्या तर सर्वांना चालक म्हणून सामावून घेतले जाणार आहे.

देशात प्रथमच लांब पल्ल्याच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी चालकपदी महिलांचा समावेश केला जाणार आहे. एसटी महामंडळाने अलीकडेच चालक पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये चालक पदासाठी महिलांना 33 टक्‍के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

राज्यभरातून या जाहिरातीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
ते म्हणाले, 'एसटी बसच्या चालक पदासाठी महिलांनाही संधी दिली जावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. महिला विमाने चालवतात तर लांब पल्ल्याच्या गाड्या का नाही चालवणार? आमच्या अपेक्षेप्रमाणे यास प्रतिसाद मिळाला असून, 450 महिलांनी चालकाच्या पदासाठी अर्ज केले.''

लांब पल्ल्याच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी चालकाला काटेकोर परीक्षांची पातळी ओलांडावी लागते. महिलांनादेखील या परीक्षांमधून जावे लागणार असले तरी, त्यांना एक संधी अधिक दिली जाणार आहे. रावते म्हणाले, 'वाहन चाचणी परीक्षेत काही सेकंदांच्या फरकामुळेसुद्धा उमेदवार बाद होतो. महिलांना मात्र आम्ही एक संधी अधिक देण्याचा विचार करत आहोत.''