वैद्यकीय महाविद्यालयांत आठ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

संचालनालयाकडून यादी जाहीर; चार हजार "एमबीबीएस'कडे

संचालनालयाकडून यादी जाहीर; चार हजार "एमबीबीएस'कडे
मुंबई - खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी आडमुठेपणाची भूमिका मागे घेतल्यानंतर अखेर मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) प्रवेश यादी जाहीर केली. खासगी व सरकारी महाविद्यालयांत तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यापैकी चार हजार विद्यार्थी "एमबीबीएस'च्या प्रवेशाला पात्र ठरले आहेत. उर्वरित चार हजार विद्यार्थी नर्सिंग, आयुर्वेद आणि दंत वैद्यक विभागातील प्रवेशासाठी पात्र ठरले. वैद्यकीय प्रवेशातील आधीच्या यादीतील दोन हजार चारशे विद्यार्थी संख्या कायम राहिली आहे. खासगी महाविद्यालयांत केवळ एक हजार सहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे.

गेल्या आठवड्यात "डीएमईआर'ने वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली होती; परंतु केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध झाली. रहिवासी दाखल्याच्या वादावरून पहिली यादी वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांनी राज्याबाहेरील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली; तरीही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची यादी जाहीर झाली नव्हती. शुल्क मर्यादेमुळे खासगी महाविद्यालयांनी यादी जाहीर करण्यास नकार दिला होता.