मुंबई - तिकीट दरावरून सुरवातीपासूनच एसी लोकल चर्चेत राहिली. तिकीट काढण्यापासून ते कुठे मिळेल याबाबत प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. त्यात एसी लोकलला थांबा नसतानाही मीरा रोडपर्यंतचे तिकीट देण्याचा प्रताप चर्चगेट स्थानकातील तिकीट बुकिंग केंद्रावर झाला. याविरोधात प्रवाशांनी सोशल मीडियावरून पश्चिम रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.
एका प्रवाशाने चर्चगेट येथून 18 जानेवारीला सायंकाळी 7.33 वाजता एसी लोकलचे तिकीट काढले. थांबा नसतानाही त्या प्रवाशाला चर्चगेट ते मीरा रोड असे तिकीट देण्यात आले. त्यासाठी एकेरी भाडे 175 रुपये आकारण्यात आले. चर्चगेटहून निघालेली एसी लोकल बोरिवलीनंतर थेट भाईंदर स्थानकात थांबली. त्या वेळी या लोकलला मीरा रोड स्थानकात थांबा नसल्याचे त्या प्रवाशाच्या लक्षात आले. थांबाच नसेल तर तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याने मीरा रोडपर्यंतचे तिकीट दिलेच कसे, असा सवाल प्रवासी आणि तक्रारदार महेश बबन शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकल नसतानाही तिकीट
शनिवार आणि रविवारी देखभालीच्या कारणास्तव एसी लोकल धावत नाही. तरीही यापूर्वी एका प्रवाशाला शनिवारी विरार ते चर्चगेटपर्यंतचे तिकीट देण्यात आले होते. तिकिटाचा हा गोंधळ थांबावावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
|