आरोपी प्रसन्न चमनकरांचा एसीबी अहवालासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुंबई - नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कंत्राटदार प्रसन्न चमनकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) सीलबंद अहवाल मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

मुंबई - नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कंत्राटदार प्रसन्न चमनकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) सीलबंद अहवाल मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आरोपी असलेल्या नऊ प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराचाही समावेश आहे. एसीबीसह अन्य तपास यंत्रणांनी सुरू केलेल्या चौकशीबाबत न्यायालयात सीलबंद अहवाल दाखल केले आहेत. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे आज याचिकेवर सुनावणी झाली.

तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या अहवालाची प्रत मिळावी, अशी मागणी या वेळी चमनकर यांच्या वतीने करण्यात आली. सीलबंद अहवालासाठी प्रथम न्यायालयीन रजिस्ट्रारकडे अर्ज करावा, असे खंडपीठाने स्पष्ट केले. विशेष न्यायालयातही त्यांनी ही मागणी केली होती. मात्र, अहवाल उच्च न्यायालयात असल्यामुळे विशेष न्यायालयाने ते देण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. सहा महिन्यांपासून भुजबळ तुरुंगात आहेत. एसीबीसह ईडी आणि प्राप्तिकर विभाग त्यांच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करीत आहेत.