संपात सहभागी झाल्यास एसटी कामगारांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

महामंडळाचा इशारा; पहिल्या दिवशी 70 टक्‍के मतदान

महामंडळाचा इशारा; पहिल्या दिवशी 70 टक्‍के मतदान
मुंबई - सातवा वेतन आयोग लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने संपाची तयारी सुरू केली आहे. संपाबाबत दोन दिवस राज्यभर एसटी कर्मचारी व कामगारांचे मतदान घेतले जाणार आहे. शुक्रवारपासून मतदानाला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी 70 टक्‍के कामगारांनी मतदान केल्याचा दावा संघटनेने केला आहे. या संपात सहभागी झाल्यास कामगारांवर कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

एसटी कामगारांची मतदान प्रक्रिया आणि संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करत आहे. संपावर जावे की नाही, याबाबत एसटीच्या हद्दीत मतदान घेता येणार नाही, असा नियम दाखवत याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महामंडळाने दिला. परंतु, 26 व 27 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत पहिल्याच दिवशी 70 टक्‍के कामगारांनी मतदान केल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. मतदानाला आणखी एक दिवस बाकी असून, हे मतदान 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तवली. मतदान झाल्यानंतर या कामगारांचा कौल संपाच्या बाजूने आहे की नाही, हे स्पष्ट होईल. त्यानंतर आमच्यासोबत असलेल्या अन्य संघटनांची बैठक घेऊन संपाची तारीख ठरवली जाईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. एसटी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल यांनी संपात सहभागी झाल्यास कामगारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

कामगार संघटनेने करार करण्यासाठी पुढे यावे, असे वारंवार सांगण्यात आले आहे. तरीही संघटना करार न करता सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत.
- दिवाकर रावते (परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष)

आमच्या संघटनेने संपाला पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची मान्यता टिकविण्यासाठी ही धडपड सुरू आहे.
- श्रीरंग बरगे (सरचिटणीस, एसटी कर्मचारी कॉंग्रेस)