सार्वजनिक ठिकाणी टायर पेटवल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी विषारी धूर निर्माण करणारे टायर पेटवण्यास यापुढे मनाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्देशामुळे टायर पेटवण्याचा प्रकार बेकायदा ठरवणाऱ्या जगातील मोजक्‍या देशांत भारताचा समावेश झाला आहे.

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी विषारी धूर निर्माण करणारे टायर पेटवण्यास यापुढे मनाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्देशामुळे टायर पेटवण्याचा प्रकार बेकायदा ठरवणाऱ्या जगातील मोजक्‍या देशांत भारताचा समावेश झाला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) याप्रकरणी सर्वेक्षण करून टायर जाळण्याच्या प्रकारामुळे होणाऱ्या मानवी व पर्यावरणाच्या हानीचा अहवाल तयार करावा आणि यासंदर्भात अधिसूचना काढावी, असे आदेश पर्यावरण विभागाने दिले होते. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधिसूचना देण्याची जबाबदारी एमपीसीबीवर देण्यात आली होती. टायर मोकळ्या जागांवर जाळण्यास, वीटभट्टी किंवा तत्सम ठिकाणी इंधन म्हणून वापरण्यासही राष्ट्रीय हरित लवादाचे न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी मनाई आदेश दिले होते. मात्र, याचे पालन होत नसल्याबद्दल ऍड. असीम सरोदे यांनी पुन्हा याचिका केली. टायर नष्ट करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभारावी, टायरच्या पुनर्वापरासंदर्भात नियम तयार करावेत, प्रदूषणासंदर्भात जनजागृती करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या.
महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा सरकारने टायर जाळण्यास मनाई केली आहे. पोलिस व प्रदूषण नियंत्रण मंडळाने टायर जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्या. सुभाष कऱ्हाळे यांनी दिले आहेत. यासाठी आयआयटी पवईचे तज्ज्ञ प्रा. डॉ. श्‍याम आरोलेकर यांचा अहवाल ग्राह्य धरण्यात आला.

टायर जाळल्याने घातक वायूंचे उत्सर्जन
टायर जाळल्यानंतर कार्बन मोनॉक्‍साईड, सल्फर ऑक्‍साईड, ऑक्‍साईड ऑफ नायट्रोजन, व्होलॅटाईल अशा घातक वायूंचे उत्सर्जन होते. या वायूंमुळे त्वचा, डोळे, श्‍वसन, मज्जासंस्था आदींवर दुष्परिणाम होतात. यातून अल्प व दीर्घकालीन आजार, नैराश्‍य, कर्करोग होऊ शकतो.