लाज न बाळगता कामाला देव माना!

लाज न बाळगता कामाला देव माना!

शिवडी - ‘दार उघड बाई, दार उघड’ अशी साद देत महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांमध्ये उत्साह भरणारे, आपल्या संवाद कौशल्याने तमाम वहिनींची ‘मन की बात’ जाणणारे लाडके भावजी अभिनेता आदेश बांदेकरने शनिवारी (ता. १५) काळाचौकी येथील शिवाजी विद्यालय समूहाच्या एस. एस. एम. मोहनबाई चुनीलाल मेहता कन्याशाळेतील ज्युनियर लीडरशी मनमुराद संवाद साधला. आयुष्यात लीडर व्हायचे असेल, तर त्याची सुरुवात घरापासून करायला हवी. आपल्या आई वडिलांना आवडेल अशा पद्धतीने काम केले तरच परिसर, शहर, राज्य आणि देशात उत्तम लीडर बनून आपण काम करू शकतो; मात्र यासाठी क्षेत्र कोणतेही असो. कामाची लाज न बाळगता पडेल ते काम केले पाहिजे. कामाला देव मानायला हवे, असा सल्ला आदेश बांदेकरने विद्यार्थिनींना दिला. या वेळी शिवाजी विद्यालयाचे संचालक राजन लोकेगावकर, सहसंचालिका शुभदा लोकेगावकर, मुख्याध्यापिका ज्योती राणे, पर्यवेक्षक रमा कारळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुधा मसूरकर, नित्यानंद बालमंदिरच्या मुख्याध्यापिका शुभदा पेडणेकर, शिक्षक, सर्व शाळेचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

काळाचौकीतील शिवाजी विद्यालयात अभिनेता आदेश बांदेकर येताच आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. आदेशचे औक्षण झाल्यानंतर शाळेच्या सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात ‘होम मिनिस्टर’ गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर ‘बाप्पा विघ्नहर्ता’ या गाण्यावर विद्यार्थिनींनी नृत्य सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘जय महिषासूर मर्दिनी’ या गाण्यावर आधारित विद्यार्थिनींनी योगा प्रात्यक्षिके दाखवत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाने भारावून गेलेल्या आदेशने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांसोबत धम्माल केली. आपल्याच शाळेत आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याचा एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना त्याने विद्यार्थ्यांना सांगितले की, मी या शाळेतील माजी विद्यार्थी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मिळणार नाही, असा आत्मविश्वास या शाळेने मला दिला. तुम्हीही असा आत्मविश्वास मिळवा, असा उपदेशही त्याने दिला. आदेशने विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तरातून संवाद साधला. विद्यार्थिनींनीही आदेशला उत्स्फूर्तपणे प्रश्‍न विचारले. एक विद्यार्थी म्हणून घडत असताना आपण एक चांगला माणूस म्हणूनही घडलो पाहिजे. यासाठी प्रत्येकाच्या बुद्धीला चालना देणाऱ्या ‘सकाळ ज्युनियर लीडर स्पर्धे’त सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, असा सल्ला त्याने दिला. या अभिनव स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या तंत्रज्ञाची थेट ओळख करून देण्यासाठी सहल आणि भविष्यात उपयोगात येतील, अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. एवढ्या सुंदर स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभागी झालेच पाहिजे, असे त्याने आवर्जून सांगितले.

शिवाजी विद्यालयाच्या ‘बालमंदिर’मधील प्रत्येक वास्तूने माझ्यावर प्रेम केले आणि पाठीवर हात फिरविणारे शिक्षक मला लाभले. ४६ वर्षांपूर्वी या शाळेच्या वास्तूने मला तथास्तु म्हटले म्हणून आज मी यशस्वी झालो. यासाठी आयुष्यात पडेल ते काम केले, कामाला प्रथम स्थान देत देव मानले. म्हणून यशाचे शिखर गाठले. तरीही प्रत्येक दिवस श्रम आणि अनुभवाचा असतो हे विसरलो नाही. आपणही आलेल्या संधीचा लाभ घ्या आणि आयुष्यात आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीने कार्यरत राहा, म्हणजे लीडर होण्यास वेळ लागणार नाही. शाळेच्या फळ्यावर माझे नाव प्रमुख अतिथी म्हणून आले यापेक्षा विद्यार्थी म्हणून दुसरा आनंद काय असू शकेल. हे विद्यार्थी म्हणून तुम्ही जाणून घ्या आणि चांगल्या कामाची सुरुवात करा. यश आपल्याच पदरी पडणार हे निश्‍चित.

डिजिटल युगात जगणारी ही मुले अभ्यास आणि मोबाईलमधील जगात रमू लागली आहेत. त्यांच्या कलागुणांना आणि बुद्धीला चालना देणारी ‘सकाळ ज्युनियर लीडर’ ही स्पर्धा कौतुकास्पद आहे. आम्ही शाळेत अनेक उपक्रम राबवित असलो, तरी ही स्पर्धा विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी आहे. आमच्या शाळेत ही स्पर्धा दुसऱ्यांदा घेण्यात येत आहे. ‘सकाळ’च्या ‘ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी’ उपक्रमाला आमची शाळा पाठिंबा देणार आहे. त्यासाठी योग्य नियोजन करून गणेशोत्सव काळात शाळेत हा उपक्रम राबविण्यात येईल.
- ज्योती राणे, मुख्यध्यापिका

विद्यार्थिनींचा आत्मविश्वास बळावला
आपल्याला इतरांपेक्षा वेगळे काय करता येईल, याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. माझी शाळा माझ्यासाठी काय करते? त्यापेक्षा मी शाळेसाठी काय करू शकतो, असे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे आपल्या भविष्याला योग्य दिशा मिळेल. आदेशने आपण आयुष्यातील यशाचे शिखर कसे गाठले यावर मोलाचे मार्गदर्शन केल्यानंतर विद्यार्थिनींचा आत्मविश्वास बळावला. तुमचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून आम्हीही उत्तम लीडर होणार, असा निश्‍चय या वेळी विद्यार्थिनींनी बोलून दाखवला. 

एकच धम्माल
विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पद्धतीने आदेश बांदेकर यांचे स्वागत केले. त्यानंतर मौजमजा करीत विद्यार्थिनींनी हे सर्व क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपले. सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करत सकाळच्या ज्युनियर लीडर स्पर्धेला आदेशबरोबर साद घालत एकच धम्माल केली.

बक्षीस द्यायला येईन
ज्युनियर लीडर स्पर्धेत यशस्वी झाल्यानंतर बक्षीस देण्यासाठी पुन्हा याल का? असा प्रश्न आरती सानप या विद्यार्थिनीने विचारल्यानंतर स्पर्धा जिंकण्यासाठीच खेळायची असते. तुझा आत्मविश्वास पाहून मी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस द्यायला नक्कीच येईन, अशी ग्वाही आदेश बांदेकरने विद्यार्थिनींना दिली.

सकाळ वृत्तपत्र आवर्जून वाचा
ज्युनियर लीडर स्पर्धेत सहभागी व्हा; पण देशातील प्रत्येक घडामोडीचे उत्तम वार्तांकन करणाऱ्या आणि छोट्या दोस्तांसाठी अनेक उपक्रम राबविणारे ‘सकाळ’ वृत्तपत्र आवर्जून वाचा. यामुळे तुम्ही घडणार आहात. तुमच्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या ‘ज्युनियर लीडर’ स्पर्धेंत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना समाजापुढे आणा. संधी रोज मिळत नाही म्हणून या स्पर्धेतून मिळालेल्या संधीचा लाभ घ्या, असा कानमंत्रही आदेश बांदेकरने विद्यार्थिनींना दिला. 

‘सकाळ’ म्हणजे समाज मनाचे प्रतिबिंब 
सुखद सकाळ म्हणजे एका हातात वाफळता चहा... दुसऱ्या हातात दर्जेदार ‘सकाळ’ वृत्तपत्र. दृकश्राव्य माध्यमांचा प्रभाव कितीही प्रचंड असला, तरी हे सुखद चित्र तसूभरही बदलले नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाणारे ‘सकाळ’ वृत्तपत्र आता केवळ वार्तांकनच करीत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला जे जे रुचेल ते ते पुरविते. समाज मनाचे प्रतिबिंब दाखवण्यात ‘सकाळ’ आघाडीवर आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी कोडी, छोटे वैज्ञानिक प्रयोग, बोधकथा, बालमित्र, कॉलेजवयीन युवक, महिला, पुरुष वर्ग यांच्या वैचारिक पोषणाची जबाबदारी घेणारे हे वृत्तपत्र, असे कौतुक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी वर्गाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा तोडकरी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com