ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी आंदोलन

संजीत वायंगणकर
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

आम्हाला पाणी द्या या मागणीसाठी “रिपब्लिकन सेना” तर्फे एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात आले. पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता विलास पाटील यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले

 डोंबिवली -  जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत असून कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या 27गावांची पाण्याची तहान कायम आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामीण विभागातील नागरिक त्रस्त आहेत. आम्हाला पाणी द्या या मागणीसाठी “रिपब्लिकन सेना” तर्फे एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात आले. पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता विलास पाटील यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.

रिपब्लिकन सेना डोंबिवली शहर अध्यक्ष आनंद नवसागरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्वेकडील इंदिरा चौकात एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष संभाजी साबणे, विभाग प्रमुख अनंत पारदुले यांच्यासह पदाधिकारी उपोषणास बसले होते.

नांदिवली पंचानंद येथील मुख्य पाईप लाईन तपासून त्यावरील अनधिकृत जोडणी त्वरित काढावी, प्रभाग क्रमांक 112,113,वा115 या तीन प्रभागात मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकावी, गांधीनगर टॅपिंग 100 मी.मी. आहे ते वाढवुन 250 मी.मी. करणे. नांदिवली पंचानंद येथे 3 इंचाची पाईप लाईन आहे ती वाढवुन 6 इंचाची करणे, या  मागणीसाठी “रिपब्लिकन सेना” तर्फे उपोषण करण्यात आले. उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घेण्यासाठी पालिका सभागृह नेते राजेश मोरे यांनी भेट घेतली.

अखेर सर्वांच्या आश्वासनानंतर  उपोषण मागे घेतल्याचे नवसागरे यांनी सांगितले. परंतु या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आम्ही आमरण उपोषण करू असेही उपस्थित अधिकाऱयांना चोख सांगितले.

Web Title: mumbai news: agitation for water