अमर महल उड्डाण पुलावरील क्रेन अपघाताची चौकशी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई - पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूर येथील अमर महल उड्डाण पुलाजवळ हायड्रॉलिक क्रेन पुलावरून पडल्याने जीवित अथवा वित्त हानी झाली नसली, तरी या अपघाताची चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवले आहे.

अमर महल येथील उड्डाण पुलाचे सुपरस्ट्रक्‍चर बदलण्याचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्‍शन कंपनीला नऊ जून 2017 ला देण्यात आले आहे. या कंत्राटदार कंपनीमार्फत शनिवारी (ता. 29) ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील काही कामासाठी हायड्रॉलिक क्रेनचा वापर करण्यात येत होता. जेवणाची सुटी झाल्याने दुपारी दोन वाजता या क्रेनला जॅक व हॅंडब्रेक लावून ती बंद करण्यात आली होती. परंतु, हॅंडब्रेक सुटल्यामुळे क्रेन उतारावर असल्याने पुढे जाऊन ती पुलाखाली कोसळली. या वेळी जंक्‍शनच्या सिग्नलवर वाहतूक थांबली असल्याने अनर्थ टळला; मात्र, या अपघाताची चौकशी करण्यात येईल. तसेच अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याबाबत संबधित कंत्राटदाराला आवश्‍यक ती दक्षता घेण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या असल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.