खटले मागे घेण्यासाठी दमानिया यांना धमकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

दाऊदने दूरध्वनी केल्याचा दावा

मुंबई: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यासाठी धमकीचा दूरध्वनी आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा दूरध्वनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

अंजली दमानिया या शुक्रवारी (ता. 22) मध्यरात्री त्यांच्या पतीसोबत मोबाईलवर चॅटिंग करीत असताना त्यांना धमकीचा दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने नाव सांगितले नाही, मात्र त्याने खडसेंविरोधातील तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याचे दमानिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. धमकी देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांक परदेशातील असून तो ट्रू कॉलरवर तपासला असता "दाऊद पाकिस्तान' असा उल्लेख दिसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ या बाबतची माहिती पोलिस आयुक्तांना दिली. वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली. याप्रकरणी गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे.

अंजली दमानिया यांना धमकी दिल्याबाबत आम आदमी पक्षाच्या प्रवक्‍त्या प्रीती मेनन शर्मा यांनी या निषेध नोंदविला असून, कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन "रॉ' किंवा "आयबी' मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हा क्रमांक दाऊद याची पत्नी मेहजबीन हिचा असून, तो कराचीतील असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: mumbai news anjali Damania threatens dawood ibrahim