स्वयंचलित दरवाजाचा पश्‍चिम रेल्वेवर प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई - लोकलमधून पडून प्रवाशांना होणारे अपघात टाळण्यासाठी लोकलला स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा प्रयोग पश्‍चिम रेल्वे पुन्हा करणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून, या कामाचे कंत्राटही देण्यात आले आहे. सुरवातीला एका लोकलमध्ये 20 स्वयंचलित दरवाजे लावण्यात येतील, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग पश्‍चिम रेल्वेकडून वर्षभरापूर्वी झाला होता; मात्र तांत्रिक अडचणी उद्‌भवल्याने तो फसला. आता पुन्हा हा प्रयोग केला जाणार असून, त्यासाठी नवीन यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. याबाबत पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले की, स्वयंचलित दरवाजाची रचना मंजूर झाली आहे. हे दरवाजे बसवण्याचे कंत्राटही देण्यात आले आहे. सुरवातीला एका लोकलला 20 स्वयंचलित दरवाजे बसवले जातील. हे दरवाजे महिलांच्या डब्यांना असतील. महालक्ष्मी येथील कार्यशाळेत त्याचे काम केले जाईल. त्यासाठी दोन-तीन महिने लागतील. या लोकलच्या चाचण्या घेतल्यानंतरच ती प्रवाशांच्या सेवेत येईल.

दरम्यान, मध्य रेल्वेही एका लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग करणार आहे. त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.