भगत उद्यानाची दुरवस्था 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

बेलापूर - नेरूळ प्रभाग ९५ सेक्‍टर- १२ मधील पंडित रामा भगत उद्यानाची दुरवस्था झाली आहे. तेथील खेळण्यांचीही मोडतोड झाली असून अनेक दिवसांपासून येथील हायमास्ट बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी उद्यानात अंधार पसरतो. याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

नेरूळ सारसोळे डेपो हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या डेपोशेजारीच पालिकेचे भगत उद्यान आहे. तेथे नागरिक आणि लहान मुले दररोज मोठ्या संख्येने येतात. या उद्यानाच्या नामफलकाची दुरवस्था झाली आहे. त्यावरील नावे गळून पडली आहेत. उद्यानात एक हायमास्ट आहे; परंतु तो अनेक दिवसांपासून बंद आहे. याविषयी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला. परंतु हायमास्ट गंजला असल्याने नादुरुस्त विजेचे दिवे दुरुस्त करण्यात अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगून हात झटकले. त्यामुळे तेथे दुसरा विजेचा खांब बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. या उद्यानातील घसरगुंडीसोबत लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या फायबरच्या हत्तीची दुरवस्था झाली आहे. तुटलेला हत्ती उद्यानाच्या कडेला टाकला आहे. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.