बाईकर्सनी दिला स्वच्छतेचा संदेश

बाईकर्सनी दिला स्वच्छतेचा संदेश

बेलापूर - प्रजासत्ताकदिनी नवी मुंबईत काढलेल्या बाईक रॅलीत दुचाकीस्वारांनी ‘स्वच्छ नवी मुंबई’, ‘सुंदर नवी मुंबई’चा संदेश दिला. एक हजार ५२५ दुचाकीस्वार सहभागी झालेली ही रॅली ऐरोलीतील पटनी ग्राऊंडपासून सुरू झाली. सीबीडी-बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाजवळून करावे-नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात तिचा समारोप झाला. या रॅलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

स्वच्छतेत गेल्या वर्षी देशात आठवा क्रमांक मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने यावर्षी पहिला क्रमांक मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकही यात महापालिकेला सहकार्य करत आहेत. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून ‘क्रूझ इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १,५२५ दुचाकीस्वारांनी भाग घेतला. आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते आणि उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐरोलीतील पटनी ग्राऊंडपासून सुरू झालेली ही विक्रमी बाईक रॅली दिवा कोळीवाडा चौक, राबाडे गाव, तळवलीमार्गे घणसोली एनएमएमटी डेपोसमोरून कोपरखैरणे तीन टाकीमार्गे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अरेंजा कॉर्नर, पामबीच मार्गाने महापालिका मुख्यालय, गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान, करावे तलावाजवळ नेरूळ येथे या रॅलीची सांगता झाली. दिघा ते सीबीडी-बेलापूर असा स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या विक्रमी रॅलीची गिनीज बुकात नोंद झाली आहे. पटनी ग्राऊंडमध्ये मोटरसायकल विशिष्ट पद्धतीने उभ्या करून तयार केलेली बाईकची प्रतिकृती तसेच गणपतशेठ तांडेल मैदानात याच पद्धतीने तयार केलेली स्वच्छ भारत अभियानाच्या चष्म्याच्या बोधचिन्हाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. 

‘गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर’ मंजुनाथन यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या रॅलीच्या सांगता समारंभाला महापौर जयवंत सुतार उपस्थित होते. बाईक रॅलीचे कर्णधार मंजुनाथन, विक्रमवीर पवित्र पात्रो आणि बाईकवर विश्‍वभ्रमण करणारे बाईकस्वार भारद्वाज देयाला यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. 

प्रकाश नाडर यांचा गौरव
या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले विविध राज्यांमध्ये ११० वेळा रक्तदान करणारे प्रकाश नाडर यांचाही सन्मान करण्यात आला. आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, नगरसेविका मनीषा भोईर, मीरा पाटील, नगरसेवक विनोद म्हात्रे, डॉ. जयाजी नाथ, गिरीश म्हात्रे, प्रकाश मोरे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com