नेरूळमधील वाहनतळ ओस

योगेश पिंगळे
गुरुवार, 20 जुलै 2017

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर- १९ मधील वंडर्स पार्कमधील वाहनतळाच्या जागेचा वापर न करता प्रवेशद्वाराजवळ बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे येथील वाहनतळ ओस पडला आहे; तर दुसरीकडे पालिकेचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर- १९ मधील वंडर्स पार्कमधील वाहनतळाच्या जागेचा वापर न करता प्रवेशद्वाराजवळ बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे येथील वाहनतळ ओस पडला आहे; तर दुसरीकडे पालिकेचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

नवी मुंबई शहराचे वैभव आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक येतात. पावसाळ्यात येथील खेळणी बंद असली तरी फिरण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. पालिकेने त्यांना सुविधा देताना वंडर्स पार्कशेजारी पार्किंगसाठी मोठी जागा ठेवली आहे. या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी दुचाकीला १० रुपये आणि मोटारीला ५० रुपये शुल्क आकारले जाते. परंतु येथे येणारे नागरिक पार्किंगचे पैसे वाचवण्यासाठी पार्कसमोरच्या पदपथावर आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. पालिकेने तेथे ‘नो पार्किंग’चा फलक लावलेला नाही. त्यामुळे या मंडळीचे फावते आणि पालिकेचे पार्किंग रिकामे राहत असल्याने दर वर्षी लाखो रुपयांचे पालिकेचे नुकसान होत आहे. या बेकायदा पार्किंगला पालिकेने आळा घातला तर उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

नियमाला हरताळ
वंडर्स पार्कमध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रवेशशुल्क भरल्याशिवाय आत जाता येणार नाही, असा नियम असला तरी त्याला येथे हरताळ फासण्याचे काम केले जाते. या ठिकाणी काम करणारे पालिकेचे आणि कंत्राटदाराचे कर्मचारी त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि ओळखीच्या व्यक्तींना मोफत प्रवेश देतात. या गोष्टीमुळेही पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे अशा मंडळींवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

वंडर्स पार्कच्या प्रवेशद्वारावरील बेकायदा पार्किंग रोखण्यासाठी तेथे ‘नो पार्किंग’चे फलक लावण्याची ‘सकाळ’ने केलेली सूचना रास्त आहे. त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे पालिकेला पार्किंगमधून चांगले उत्पन्न मिळेल. वंडर्स पार्क येथे प्रवेशासाठी कोणालाही सूट दिलेली नाही. तेथील कर्मचारी असे काही प्रकार करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारांवर यापुढे लक्ष ठेवू. 
- रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त.