सरकारी रुग्णालयांमध्ये "बायोमेट्रिक' अन्‌ "सीसीटीव्ही'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - राज्यातील आरोग्यसेवेची उपलब्धता आणि दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. "बायोमेट्रिक'च्या समोरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.

रुग्णालयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगबाबत दर सात दिवसांनी वरिष्ठ यंत्रणांना अहवाल सादर करावा, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिले. राज्यातील विविध भागांतील आरोग्यसेवाविषयक समस्यांबाबतचा आढावा घेण्यासाठीची बैठक मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या दालनात आज झाली, त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. सावंत म्हणाले, की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयातील "क' आणि "ड' वर्गातील आरोग्यसेवकांच्या नियुक्तीसाठीची परीक्षा नुकतीच घेण्यात आली असून, तिचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. 30 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन रिक्त जागांवर आरोग्यसेवक रुजू होतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.