आमीर खान, किरण रावला स्वाइन फ्लूची लागण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पाणी फाउंडेशनतर्फे रविवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमाला आमीर सपत्नीक उपस्थित राहणार होता.

मुंबई : अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यांच्या घरीच दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पाणी फाउंडेशनच्या पुण्यात आयोजित कार्यक्रमाला आज (ता. 6) अभिनेता शाहरुख खान उपस्थित होता, असे सांगण्यात आले.

पाणी फाउंडेशनतर्फे रविवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमाला आमीर सपत्नीक उपस्थित राहणार होता. मात्र, स्वाइन फ्लूची लागण झालेली असल्यामुळे या कार्यक्रमाला दोघेही अनुपस्थित होते. या कार्यक्रमावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना आमीरनेच स्वतः ही माहिती दिली.

"रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्यानंतर मला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून कुठल्याही कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नाही,'' असे आमीरने सांगितले. आमीर आणि किरण यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी उपचार करण्यात येत आहेत. आमीरने पाणी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे.