घातपाताच झाल्याचा दावा करणारी याचिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेत घातपात असावा, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी (ता. 5) सुनावणी होणार आहे.

मुंबई - एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेत घातपात असावा, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी (ता. 5) सुनावणी होणार आहे.

एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू झाला; तर 39 जण गंभीर जखमी झाले होते. पावसामुळे पुलावर आडोशाला थांबलेले प्रवासी आणि मध्य - पश्‍चिम रेल्वेच्या लोकल एकाचवेळी आल्याने झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या वेळी अफवांमुळेही धावपळ उडाली, असे कारण रेल्वे प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, संपूर्ण दुर्घटना ही अफवेमुळे झाली नसून यात घातपात आहे, असा दावा याचिकादार फैजल बनारसवाला यांनी केला आहे. या दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. गुरुवारी न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

ही चेंगराचेंगरी दहशतवादी हल्ल्याचा प्रकार तर नाही ना, याची चौकशी करण्याची मागणीही याचिकादाराने केली आहे. यासह दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी याचिकादाराने भोईवाडा पोलिस ठाण्यात अर्जही केला आहे. दुर्घटनेवेळी शॉर्ट सर्किट झाल्याची आणि पूल पडल्याची अफवा पसरल्याचे सांगितले जात होते. मात्र, याबाबत जखमी किंवा प्रत्यक्षदर्शींकडून दुजोरा मिळाला नसल्याचे याचिकादाराचे म्हणणे आहे.