महापौरांची मेजवानी अन्‌ सोमय्यांचा गरबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला. त्याच रात्री महापौर निवासस्थानावर परदेशी फुटबॉलपटूंसाठी मेजवानी रंगली होती. या फुटबॉलपटूंचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी स्वागत केले. दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्या मुलुंडमध्ये गरब्यात रंगले होते.

एल्फिन्स्टन रोड येथे शुक्रवारी (ता. 29) झालेल्या चेंगराचेंगरीत जागीच 22 जणांचा मृत्यू झाला. त्यातील जखमींपैकी एकाचा शनिवारी (ता. 30) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी केईएम रुग्णालयात धाव घेत "पर्यटन' केले. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या होत्या. मात्र, दुर्घटनेनंतर सूर्य अस्ताला जाताच शिवसेना व भाजपच्या नेत्यांची संवेदनाही संपल्याची टीका काही घटनांवरून सुरू झाली आहे. महापौर बंगल्यावर त्याच सायंकाळी परदेशी फुटबॉलपटूंसाठी मेजवानीचा बेत होता. या वेळी आदित्य ठाकरे आणि महापौर महाडेश्‍वर यांनी खेळाडूंचे स्वागत केल्याचे समजते.

शिवसेनेची ही संवेदना चव्हाट्यावर आलेली असतानाच भाजपही यातून सुटलेला नाही. कॉंग्रेसच्या राज्यात रेल्वेच्या प्रश्‍नावर नेहमीच आक्रमक असणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या गरबा खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विटरद्वारे सोमय्या यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे. या संदर्भात सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल क्रमांक कार्यालयाच्या क्रमांकावर वळवण्यात आला होता. "साहेब आज कार्यक्रमात आहेत', असे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.