ब्राऊन पावडरचीही तस्करी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मुंबई - सोन्याला शुद्धता आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्राऊन पावडरची तस्करी करणाऱ्या एका महिलेला सहारा विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) ताब्यात घेतले. या महिलेकडून सुमारे 12 लाख 29 हजार 749 रुपये किमतीची 450 ग्रॅम पावडर जप्त केली आहे. सोने तस्करीकरिता तस्करांकडून नवनवीन युक्‍त्या वापरल्या जातात. त्यानुसार, एआययूच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवले जाते. दुबईहून आलेल्या एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्या वेळी या महिलेकडील साहित्याची तपासणी केली. तेव्हा एका पाकिटात सोन्याला शुद्धता आणण्याकरिता लागणारी ब्राऊन पावडर दिसून आली. या महिलेला पावडर कोणी दिली, मुंबईत आल्यावर ती पावडर नेमकी कोणाला देणार होती, याचा तपास केला जात आहे.