अमरावती टेक्‍सटाईल्समध्ये उद्योजकांचा ओघ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या अमरावती येथील नांदगाव पेठच्या टेक्‍सटाईल्स पार्कमध्ये उद्योजकांचा ओघ सुरू असून दोन वर्षांत तेथे सात हजार 494 कोटी 88 लाख रुपयांची निर्मिती झाली आहे. यामुळे 19 हजार 445 नवीन रोजगारनिर्मिती झाली असून पुढील दोन वर्षांत अंदाजे दोन लाख रोजगारनिर्मिती करण्याचे उद्योग विभागाने उद्दिष्ट ठेवल्याची माहिती ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने दिली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विशेषतः विदर्भाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले होते. कापूसउत्पादक विभागात वस्त्रोद्योगाला चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

यासाठी अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव पेठ येथील एमआयडीसीत टेक्‍सटाईल्स पार्क उभारण्यात आले. यासाठी खासगी उद्योजकांना वीज, पाणी, रस्ते यांसह अनेक सुविधा पुरविण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर येथे दोन वर्षांत तब्बल 30 खासगी उद्योजकांनी हजारो कोटींची गुंतवणूक केली असून काही उद्योगातून उत्पादनही सुरू झाले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून 29 हजार 445 नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. नांदगाव पेठ येथील तब्बल 800 हेक्‍टर जमिनीवर कापसावर आधारित उद्योग उभारण्यात येणार असून यातून अंदाजे दोन लाख नवीन रोजगारनिर्मिती होणार आहे.

अमरावतीचा हा पार्क देशातील सर्वांत मोठे "इंडस्ट्रियल हब' असेल अशी माहिती सनदी अधिकाऱ्याने दिली. यासाठी उद्योग विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकारी अमरावती येथे जाऊन प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेत आहेत. अपर मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी आढावा घेत असल्याने उद्योजकांमध्ये विश्वासाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. नांदगाव पेठ येथील पार्कमध्ये गोल्डन फायबर एलएलपी कंपनीकडून लिनन यॉर्नचे उत्पादन सुरू आहे. लिनेन यार्न उत्पादन करणारा देशात हा तिसरा कारखाना असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी कोलकता येथे बिर्ला समूह, तर तारापूर येथे बॉम्बे रेयॉन कंपनीतून लिननचे उत्पादन सुरू आहे.

नांदगाव पेठ येथे उत्पादन सुरू असलेले उद्योग खालीलप्रमाणे-
शाम इंडोफॅब, व्हीएचएम इंडस्ट्रीज, गोल्डन फायबर, सियाराम सिल्क, जे. के. इन्व्हेस्टर्स, डव गार्मेंट्‌स, फिन्ले मिल, ऍल्प्रोज इंडस्ट्रीज, वॉलसन इंडस्ट्रीज, बीएसटी टेक्‍सटाईल्स, दामोदर इंडस्ट्रीज, प्रभुदयाल पॉलिस्टर, बालेश्‍वर सिंथेटिक्‍स, कुकरेजा डेनिम, इनोव्हा फॅब, टेक्‍नोक्राफ्ट, सुपर ब्लू डेनिम.