मांजराचा उपद्रव चोरपावलाने वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - भटके कुत्रे, रस्त्यांवरील मोकाट गाईगुरे, कबुतरे आणि उंदरांपाठोपाठ मुंबई शहरी भागात आणखी एका प्राण्याचे आक्रमण मांजरीच्या चोरपावलाने होत आहे. अर्थात हा प्राणी म्हणजे खुद्द मांजरच आहे. मुंबईत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, घरात शिरून नासधूस करणे, पाळीव कुत्र्यांना त्रास देणे, आरडाओरडा असा त्यांचा उपद्रव वाढत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत; मात्र मांजरांना आळा कसा घालावा याबाबत महापालिकाच अनभिज्ञ आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी मांजरीच्या वाढत्या संख्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. बैलघोड रुग्णालयातील डॉक्‍टर डी. यू. लोखंडे यांनी सांगितले, की काही वर्षांत मांजरे पाळण्याचे प्रमाण वाढले असल्याने त्यांची संख्याही वाढली आहे. श्‍वानाप्रमाणे मांजरे माणसांवर थेट हल्ला करत नसल्याने त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही; मात्र आता वाढलेली संख्या लक्षात घेता त्यांचा उपद्रवही वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या निर्बीजीकरणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.