नोकरीचे प्रलोभन दाखवून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - मुख्यमंत्र्यांचा खासगी सचिव असल्याचे सांगून नोकरीसाठी सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - मुख्यमंत्र्यांचा खासगी सचिव असल्याचे सांगून नोकरीसाठी सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांचा पुतण्या हा उल्हासनगर येथे एका शाळेत कंत्राटी पद्धतीने काम करत होता. तेथील कारकून 2014 ला निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी कायमस्वरूपी नोकरी द्यावी यासाठी त्याने अर्ज केला होता. तेथे दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती झाली. तेव्हा तक्रारदारांच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत भाऊराव निंबाळकर यांच्याशी ओळख झाली. निंबाळकर याने त्यांचा परिचित सिद्धेश काटे याच्याशी भेट करून दिली. काटे याने मुख्यमंत्र्यांचा खासगी सचिव असल्याचे सांगितले. त्यानंतर कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत दोन लाख रुपये कामासाठी मागितले. तक्रारदारांनी ते त्याला दिले. त्यानंतर वारंवार तो पैसे उकळत राहिला.

अशाप्रकारे तक्रारदारांकडून 16 डिसेंबर 2016 ते 28 ऑक्‍टोबर 2015 या कालावधीत एकूण सात लाख रुपये घेतले; पण काम झाले नाही. अखेर तक्रारदाराने मुख्यमंत्री कार्यालयात चौकशी केली. येथे काटे नावाची कोणतीही व्यक्ती कामाला नसल्याचे कळले. त्यामुळे तक्रारदाराच्या फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 12) याप्रकरणी काटे व निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.