'मनसे'च्या खळ्ळखट्याकला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - फेरीवाल्यांच्या निमित्ताने मनसेचे गुंड उत्तर भारतीयांना लक्ष्य करत असून, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पाठिंबा आहे, असा आरोप मंगळवारी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. अवैध धंदे चालावेत यासाठी शिवसेना-भाजप फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत नाही, असेही ते म्हणाले.

निरुपम यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली. फेरीवाल्यांविरोधात मनसे गुंडगिरी करत आहे. त्यांना फेरीवाल्यांना हटविण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले. धोरण लागू होईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईच्या लोकसंख्येनुसार तीन ते साडेतीन लाख फेरीवाल्यांचे पुनर्वसन करता येऊ शकते; मात्र साडेतीन वर्षांपासून हे धोरण लागू करण्यात आलेले नाही. शिवसेना, भाजप आणि आयुक्त जाणीवपूर्वक फेरीवाला समिती बनवत नाहीत. अवैध धंदे चालावेत यासाठी ही समिती नेमली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. या वेळी विरोधी पक्षनेते रवी राजाही उपस्थित होते.

पुनर्वसनाची मागणी
बेकायदा फेरीवाले हटवले पाहिजेत; मात्र पालिकेने 90 च्या दशकातच फेरीवाल्यांना परवाना देणे बंद केले आहे. रेल्वे स्थानकांच्या परिसरातील तसेच पादचारी पुलांवरील फेरीवाले हटवले पाहिजेत; मात्र त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करावे, अशी मागणीही निरुपम यांनी केली.