मजुरीत ढकलतात ‘काका-मामा’

मजुरीत ढकलतात ‘काका-मामा’

मुंबई - जरी काम, पर्स बनवणे, हॉटेल आदी उद्योगांमध्ये कमी पगारात राबवणाऱ्या कोवळ्या हातांच्या तस्करीचे प्रकार वाढतच आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणांहून शिक्षणाच्या नावाखाली मुलांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. मुलांच्या तस्करीत ‘काका-मामां’ची चलती असल्याचे उघड झाले आहे. आपण मुलांचे ‘काका-मामा’ असल्याचे तस्कर सांगत असल्याने पोलिसांना संशय येत नाही. त्यामुळे तस्करांनी नवीन शक्कल शोधून काढली आहे.

गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि लहानपणीच हरवलेले मायेचे छत्र याचा फायदा घेऊन बालकांना उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, नेपाळ आदी ठिकाणांहून मुंबईत आणले जाते. त्यांना मुंबईतील झोपडपट्टयांमधील कारखान्यांमध्ये जरी काम, लेदर काम किंवा हॉटेलांमध्ये राबवले जाते. कमी पगारात जास्त कामाकरता अशा मुलांची तस्करी केली जाते. पूर्वी तस्कर मुलांना घेऊन कल्याण, ठाणे, कुर्ला आदी ठिकाणी येत असायचे. पोलिस आणि सामाजिक संस्था त्यांच्यावर कारवाई करतात. कारवाईच्या भीतीने आता तस्करांनी मार्ग बदलला आहे. एक्‍स्प्रेसने महत्त्वाच्या जंक्‍शनला उतरण्याऐवजी नाशिक वा कसाऱ्यात मुलांना उतरवले जाते. त्यानंतर त्यांना खासगी बसमधून मुंबईत आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पकडल्यास तस्कर मुलांचे बनावट ‘काका-मामा’ बनतात. मुलांना मुंबई दर्शनाकरता आणले आहे, अशी बतावणी ते करतात. मुलेही भीतीपोटी काही बोलत नसल्याने त्यांच्यावर संशय घेता येत नाही. मुलांना शिक्षणाच्या नावाखाली कारखान्यात राबवले जाते. पोलिस आणि सामाजिक संस्थांना चकवा देण्याकरिता ‘तस्कर नातेवाईक’ दोन-चार दिवस कारखान्यात राहतात. कोणाला संशय येऊ नये असा तस्करांचा हेतू असतो. कारखान्यात काही तास राहिल्यानंतर ‘तस्कर नातेवाईक’ पहाटे एक्‍स्प्रेसने पळ काढतात. पोलिसांच्या कारवाईमुळे मुलांना मुंबईऐवजी उल्हासनगर, पनवेल आणि भिवंडीत नेले जात आहे. खासकरून उल्हासनगरमध्ये कारखान्यातील कामांकरिता त्यांचा वापर होत असल्याचे ‘प्रथम’ संस्थेचे नवनाथ कांबळे यांनी सांगितले. 

मुंबईतील स्थिती
मालवणी, शिवाजीनगर आदी ठिकाणी बिहार व उत्तर प्रदेशच्या मुलांना नाजूक नक्षीकाम आणि कलाकुसरीच्या कामाला जुंपले जाते. चारकोप, जोगेश्‍वरी, कुरार आदी ठिकाणी बांगडी कारखाना, पॉलिश व पॅकिंगच्या कामाकरिता मुलांचा वापर होतो. ससून डॉक आणि भाऊच्या धक्‍क्‍यावर मच्छी साफ करण्याचे काम पश्‍चिम बंगाल आणि बिहारची मुले करतात. आग्रीपाडा, धारावी, कुर्ला येथे पॅकिंगचे काम मुलांकडून करून घेतले जाते. कुर्ला, नेहरूनगर अन्‌ ठक्करबाप्पा कॉलनीत चप्पल बनवण्याचा कारखाना, पॅकिंग करणे आदी प्रकार सुरू आहेत. वांद्रे, साकीनाका, जोगेश्‍वरी व बेहरामपाड्यात बिहार-नेपाळमधील मुलांना खानावळीत जेवण बनवण्यास मदतनीस, सफाई आणि पार्सल पोहचवण्याचे काम दिले जाते. उत्तर प्रदेश-बिहारच्या मुलांना ओशिवरा आणि जोगेश्‍वरीमध्ये कामाला जुंपले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com