मुंबईत बालदिन जल्लोषात

मुंबईत बालदिन जल्लोषात

मुंबई - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुले फार आवडत. त्यामुळे त्यांची जयंती ही बालदिन म्हणून संपूर्ण देशात साजरी करण्यात येते. मुंबईतील शाळांमध्ये बालदिनानिमित्त प्रभातफेरी काढण्याबरोबरच नृत्य, गायन, संभाषण असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. त्याचप्रमाणे अनेक रुग्णालयांनी बालरुग्णांसाठी विविध कार्यक्रम ठेवले होते. हाजी अली येथील एसआरसीसी रुग्णालयातील विशेष मुलांनी गायनाचा कार्यक्रम सादर केला. तर वाडिया रुग्णालयात अंध मुलांनी संगती कार्यक्रम सादर केला. चेंबूर एज्युकेशन सोसायटीने ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबवला. 

सेंट जोसेफमध्ये जल्लोष
मुंबादेवी - दक्षिण मुंबईतील विविध शाळांमध्ये बालदिन उत्साहात झाला. उमरखाडी येथील ‘सेंट जोसेफ-सन्नी स्काइज हायस्कूल’मध्ये बालदिनानिमित्त शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी पार्टी ठेवण्यात आली होती. जवळपास ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी हंग्री भीम, डक कैचिंग गेम, बॉल गेम आदी खेळ, समूहगीत गात मुलांनी धम्माल केली. खास मुलांसाठी मिकी माऊसची आठ फुटांची रांगोळी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सेंट जोसेफ स्कूलचे मुख्याध्यापक फादर लॉरेन्स डिसूझा यांनी बालदिनाचे महत्त्व सांगताना चाचा नेहरू यांच्या काही गोष्टी-आठवणी सांगितल्या. तसेच सतत अभ्यासाचे दडपण मुलांवर आणू नये आणि मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. मुलांना मुलांप्रमाणेच राहू द्या, असे पालकांना मार्गदर्शन केले.

गांधी बाल शाळेत बालदिन
सायन :
कुर्ला येथील प्रीमिअर शिक्षण मंडळ व कोहिनूर संस्थेच्या गांधी बाल मंदिर शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात झाला. विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व सांगत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो याची माहिती देण्यात आली. या वेळी शाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक हेदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेत त्यांच्या कलागुणांना संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आवडती गाणी सादर केली. मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारून फॅशन शोची मजा लुटली. शिक्षक व पालकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थांना गोड खाऊ, फळांचे व प्राण्यांचे मुखवटे, फुगे यांचे वाटप करून बालदिन विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला.

चित्रातून व्यसनमुक्तीचा संदेश 
घाटकोपर  -
समाजात हल्ली तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनांना बळी पडताना दिसत आहेत. घर, कार्यालय, शाळा परिसरात येणारे विद्यार्थी, कर्मचारी वर्ग यांना व्यसनांचे दुष्परिणाम; तसेच स्वच्छतेचे महत्त्व समजावून दिले तर नक्कीच समाजाची हानी टळेल, या उद्देशाने बालदिनाचे निमित्त साधून आर. एन. शेठ प्राथमिक व श्रीमती एस. टी. मेहता माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छ परिसर, पर्यावरण हे विषय स्पर्धेसाठी निवडले होते. शाळेतील ५० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. 

विद्यार्थांनी काढलेल्या चित्रांतून व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, स्वच्छतेचे महत्त्व असे अर्थपूर्ण संदेश दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या भट यांनी बालवयातील विद्यार्थ्यांना चांगले आणि वाईट यातील फरक कळावा यासाठी आम्ही बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा घेतल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com