स्वच्छ पर्यटन स्थळांना स्वच्छता पुरस्कार देणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - पर्यटन स्थळांवर पर्यटकांकडून खाऊची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या टाकण्याचे प्रकार होतात. यामुळे तेथे बकाल स्वरूप पाहायला मिळते. देशातील पर्यटन स्थळांवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आपल्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळ स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांवर राहणार आहे. त्यासाठी विविध योजना, सामाजिक कार्यक्रम, लोकसहभागाची मदत घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक राज्यातील दोन पर्यटन स्थळांना स्वच्छ आणि सुंदर पर्यटन स्थळाचा पुरस्कार देण्याचेही केंद्र सरकारने ठरविले आहे.

राज्यातील सर्व पर्यटन स्थळे स्वच्छता अभियानाला जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र बऱ्याच वेळा राज्यातील एक-दोन प्रमुख पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा दिसतो. पर्यटकांनी राज्यातील बहुतांश सर्व पर्यटन स्थळे पाहावीत, त्यांना या ठिकाणी सर्व सोयीसुविधा देण्यासोबतच स्वच्छतेचा आनंद मिळवा, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. "स्वच्छ भारत' योजनेअंतर्गत ही निवड होणार असून, 6 राज्यांतील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयासोबत केंद्रीय पर्यावरण खात्याने एकत्रित पत्र पाठविले आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटकांना पर्यटन स्थळाच्या महत्त्वासोबतच स्वच्छताही आवडत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. देशविदेशातील बरीच ठिकाणे केवळ स्वच्छ असल्यानेच पर्यटन स्थळे बनली आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर ही पद्धत राज्यातील पर्यटन स्थळांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.