गावांत डॉक्‍टरांची संख्या वाढवण्याकरिता समिती

नेत्वा धुरी
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

आरोग्य संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रकाश डोके या समितीच्या अध्यक्षपदावर असतील. अन्य सहा जणांची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाईल. ही समिती डॉक्‍टर, विभाग आणि सेवाकालावधीनुसार वाढीव गुण निश्‍चित करणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या समितीचे काम सुरू होईल.
- डॉ. सतीश पवार, संचालक, आरोग्य संचालनालय

आरोग्य विभागाचा निर्णय; तीन महिन्यांत कार्यवाही
मुंबई - राज्यातील ग्रामीण आणि अतिदुर्गम परिसरांत डॉक्‍टरांची संख्या वाढावी, यासाठी नियोजन करण्याकरिता आरोग्य विभागाकडून लवकरच समितीची स्थापना केली जाणार आहे. तीन महिन्यांत यासंदर्भात कार्यवाही केली जाईल.

अपुऱ्या सोयीसुविधा, दळणवळणाची अपुरी साधने, असुरक्षितता आदी कारणांमुळे अद्याप राज्यातील अतिदुर्गम, आदिवासी क्षेत्रांत सेवा देण्यासाठी डॉक्‍टर नकार देतात. अशा परिसरांत गैरहजर राहणाऱ्या डॉक्‍टरांवर आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे; परंतु निलंबनाच्या कारवाईनंतरही डॉक्‍टरांची संख्या वाढवण्यात सातत्याने अपयश येत आहे. आरोग्य विभागाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी वाढीव गुण देण्याचा विचार सुरू केला होता.

मार्चमध्ये आरोग्य संचालनालयाने राज्यातील दुर्गम भागांनुसार गुणांची तरतूद देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला दिला. डॉक्‍टरांनी दुर्गम भागांत किमान तीन वर्षे सेवा देणे या प्रस्तावात बंधनकारक करण्यात आले. किती वाढीव गुण दिले जावेत, हे निश्‍चित करण्यासाठी आरोग्य विभागाने समितीची स्थापना करण्याचे ठरवले आहे.