मुख्याधिकाऱ्यांविरोधात चिपळूणमध्ये तक्रारी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या कारभाराविरोधात गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. पाटील यांची कार्यपद्धती बेकायदा असून, त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पी. प्रदीप यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे, याकडे वायकर यांनी लक्ष वेधले आहे.

"जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान'नुसार चिपळूण शहरात रस्त्यांवर एलईडी दिवे लावणे, तसेच अनियमित निविदाप्रकरणी ही सुनावणी सुरू आहे. नगरपालिकेच्या अखत्यारीतील बाजारपुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार पुराव्यांसह आर्किटेक्‍ट विलास आघरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याविषयी चौकशी करण्याची मागणी आमदार सदानंद चव्हाण यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात केली होती.

मुख्याधिकारी डॉ. पाटील वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे पालिकेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचीही दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दलित वस्ती सुधारणेसाठी पाच वर्षांत मिळालेल्या निधीतील एक रुपयाही खर्च झालेला नाही. त्यांनी वेळोवेळी सरकारी निधीचा अपहार केल्याचेही सिद्ध होत आहे, असे वायकर यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष तपास पथकाकडून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वायकर यांनी केली आहे.