सायरस मिस्त्रींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - सायरस मिस्त्री आणि शापूरजी पालनजी यांच्याविरोधात टाटा ट्रस्टचे विश्‍वस्त वेंकटरमण रामचंद्रन यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मिस्त्री आणि टाटा समूहातील वादात मिस्त्री यांनी बेछूट आरोप करत समूहाची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे त्यांनी भरपाई देऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी वेंकटरमण यांनी केली आहे. हा फौजदारी दावा न्यायालयाने सुनावणीसाठी मंजूर केला आहे. सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्याचे निर्देश अतिरिक्त महानगर दंडाधिकारी कृष्णा पडेलकर यांनी दिले आहेत. यात सायरस मिस्त्री, शापुरजी पालनजी आणि त्यांच्या दोन कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या दाव्यावर येत्या 24 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.