वैद्यकीय प्राध्यापकांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - विद्यार्थिनीने परीक्षेत केलेल्या कॉपीबाबत संशयास्पद अहवाल दिल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा नियंत्रकपदावरून हटवलेल्या प्राध्यापकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्राध्यापकांना नियंत्रकपदावरून हटवण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.

सात वर्षांपूर्वी झालेल्या वैद्यकीय परीक्षेच्या सांगलीतील परीक्षा केंद्राची जबाबदारी याचिकादार प्राध्यापकांवर होती. परीक्षेची पाहणी करण्यासाठी आलेल्या भरारी पथकाला एका विद्यार्थिनीच्या बेंचजवळ एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत काही मजकूर लिहिलेला होता. याबाबतचा अहवाल प्राध्यापकांनी सीलबंद स्वरूपात विद्यापीठाच्या संबंधित समितीकडे पाठविला. कॉपीचा संशयित प्रकार असा निष्कर्ष अहवालात होता; मात्र समितीने या अहवालाबाबत नाराजी व्यक्त केली. या अहवालातून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याचे आणि विद्यार्थिनीने कॉपी केली की नाही, हे स्पष्ट होत नसल्याचे कारण देत समितीने प्राध्यापकांकडील नियंत्रकपदाची जबाबदारी काढून घेतली होती.

समितीच्या या निर्णयाविरोधात प्राध्यापकांनी याचिका केली. या याचिकेवर न्या. बी. आर. गवई आणि न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. समितीने कोणतेही स्पष्टीकरण किंवा बाजू मांडण्याची संधी याचिकादार प्राध्यापकांना दिली नाही. उलट त्यांच्यावर थेट कारवाई केली. नियमानुसार अशा प्रकारे कारवाई करता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याचिकादार उच्चशिक्षित आहेत. विद्यार्थ्यांमध्येही लोकप्रिय आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप त्यांना मनस्ताप देणारा आहे, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले आणि समितीचा निर्णय रद्दबातल ठरवला.