व्यापाऱ्याला फसवणाऱ्या  दोन एजंटांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कोपरखैरणे - एपीएमसीतील प्रफुल्लचंद्र वासानजी या डाळीच्या व्यापाऱ्याची ७९ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

कोपरखैरणे - एपीएमसीतील प्रफुल्लचंद्र वासानजी या डाळीच्या व्यापाऱ्याची ७९ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

एपीएमसीमधून देश-परदेशात कृषी माल जातो. त्यामुळे दर वेळी व्यापारी थेट खरेदीसाठी न येता एजंटकडे मागणी नोंदवतात. एजंट त्यांना माल पुरवतो. संतोष पाटील आणि शिवराज पाटील हे दोघे असेच एजंट आहेत. २०१५ मध्ये त्यांनी प्रफुल्लचंद यांच्याकडे लातूर येथील व्यापारी संगमेश्‍वर ट्रेडर्स यांच्यासाठी १०० टन मसूर डाळीची ऑर्डर दिली. हे पैसे एक महिन्यात देण्याचा वायदा त्यांनी केला होता. त्यानुसार ही डाळ वीरू रोडलाईन या वाहतूक एजन्सीमार्फत पाठवण्यात आली; मात्र अनेक दिवस होऊनही पैसे न मिळाल्याने त्यांनी शिवराज यांच्याकडे चौकशी केली; मात्र त्यांनी लातूर येथील ट्रेडर्सवर जबाबदारी ढकलली. त्यानंतर प्रफुल्ल यांनी लातूरमधील एजन्सीला फोन केला तेव्हा आम्ही अशी ऑर्डर दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी वाहतूक एजन्सीला फोन केला तेव्हा ही डाळ हैदराबाद येथील व्यापाऱ्याला देण्यास पाटील यांनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर फसवणूक झाल्याचे प्रफुल्ल यांच्या लक्षात आले होते.