दादर, माहीममध्ये पालिकेने लावले बॅनर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

दादर - फेरीवाले हटाव आंदोलन झाल्यानंतर दादरसह जी उत्तर विभागातील सर्वच रेल्वेस्थानकांवर १५० मीटरची हद्द महापालिकेने आखून दिली; पण तरीही मुजोर फेरीवाले पुन्हा अतिक्रमण करतील म्हणून जी उत्तर विभागातील महापालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाला प्रतिबंधित विभाग आहे हे दर्शविण्यासाठी बॅनर लावण्याची शक्कल लढवली आहे.

जी उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या दादर, माहीम, माटुंगा, सायन या चार रेल्वेस्थानकांबाहेर हे सूचनेचे बॅनर लावले आहेत. त्यापैकी १२ ते १३ बॅनर्स हे दादर रेल्वेस्थानकाबाहेर लावण्यात आले आहेत. १५० मीटरची हद्द आखली असली, तरी काही फेरीवाले त्या विभागात अतिक्रमण करू शकतात; तसेच ही रेषा जरी पुसली गेली, तरी हा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आहे हे फेरीवाला व नागरिकांना कळावे या हेतूने हे बॅनर लावण्यात आले आहेत; तसेच या बॅनरमुळे बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करणे महापालिकेला सोपे जाईल, असे महापालिका जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.  

कुठे लावले बॅनर
महापालिका जी उत्तर विभागामध्ये येणाऱ्या दादर, माहीम, माटुंगा, सायन या रेल्वेस्थानकांत २५ बॅनर्स लावलेत. त्यापैकी १३ बॅनर्स दादरमध्ये लावले आहेत. पादचारी पूल, फुलमार्केट आणि रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्याचे मार्ग या ठिकाणी हे बॅनर लावून महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांसह नागरिकांना ‘ना फेरीवाला क्षेत्र’ कळावे यासाठी हे प्रयत्न केलेले आहेत.