फसवणूक झालेल्यांना पैसे परत मिळणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

फायनान्स कंपन्यांनी घातला होता गंडा

फायनान्स कंपन्यांनी घातला होता गंडा
मुंबई - आर्थिक गुन्हे शाखेतील (ईओडब्ल्यू) नवीन रिफंड सेल पहिल्या टप्प्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना 489 कोटींचे वाटप करणार आहे. या सेलच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, लवकरच भायखळा वाहतूक पोलिस प्रशिक्षण केंद्रात हा सेल सुरू होणार आहे. वर्षभरात या सेलद्वारे तीन हजार 500 कोटींचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या रिफंड सेलच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा सेल पहिल्या टप्प्यात 489 कोटींचे वाटप करील. 1988 ते 2005 या कालावधीतील गुंतवणूकदारांना 11 फसवणूक प्रकरणांतील मालमत्तांचा लिलाव करून ही रक्कम जमवण्यात आली आहे.

मेडिकेअर, कॉसमॉस पब्लिसिटी, कोकण पार्क, सीयू मार्केटिंग, सिमॅटिक फायनान्स, ऍडव्हेंचर ग्रुप, व्हीजेएस ग्रुप, पार्ले फायनान्स, शिवानंद फायनान्स या कंपन्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. या कंपन्यांतील गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जातील. सहायक पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी या सेलचा प्रमुख असेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व आठ पोलिस कर्मचारी काम करतील.