प्रॅक्टिकली धोके; डिजिटली ओके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला आज वर्ष पूर्ण होतेय. काळ्या पैशाच्या व्यवहारावर नियंत्रण आणण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांवर उमटला; परंतु सर्वांत जास्त भरडला गेला तो सर्वसामान्य. कॅशलेस व्यवहार आणि डिजिटलचा पर्याय सुरुवातीस अडचणीचा वाटला. तरी त्याचे चांगले परिणाम भविष्यात दिसतील, अशा प्रतिक्रिया सामान्यांसह तज्ज्ञांनी व्यक्त केल्या...

काळ्या पैशांवर नियंत्रण नाही
काळ्या पैशाच्या व्यवहारावर नियंत्रण आणणे शक्‍य झाले आहे, असे वाटत नाही; कारण बहुतेक रक्कम बॅंकेत जमा झालेली दिसते. नक्की किती काळा पैसा उघड झाला याची माहिती नाही. डिजिटल पर्यायामुळे बॅंकांमधील आणि कार्डवरील शुल्क अकारण वाढवण्यात आले आहे. वकिली करताना आम्हाला अनेकदा रोख रक्कम घ्यावी लागते, त्यात गैर काही नसते; पण बॅंकांमध्ये पैसे ठेवताना आणि काढताना शुल्क आकारणी केली जाणे त्रासदायक आहे. पैसे आमचेच असतात मग ही शुल्क आकारणी कशाला? अजूनही गावामध्ये वीज भारनियमन असते. त्यांना ऑनलाईनचे पर्याय सोईस्कर आहेत का? याचा अभ्यास सरकारने करावा.
- ॲड. दत्ता माने, मुंबई उच्च न्यायालय (मुंबई)

आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने फायदेशीर
आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने कॅशलेश व्यवहार संकल्पना अतिशय सुंदर असून, त्याचा नक्कीच फायदा होताेय. डिजिटलचा पर्याय सोईचा आहे. त्याला प्रतिसादही उत्तम मिळतोय. नोटाबंदीमुळे टेबलाखालून पैसे देण्याच्या प्रक्रियेला आळा बसला आहे; परंतु आजही काही ठिकाणी असे व्यवहार होत आहेत. सरकारने त्याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे.
- अजित रानडे, असिस्टंट जनरल मॅनेजर, ठाणे जनता सहकारी बॅंक (ठाणे)

हेतू चांगला; पण तो फसला
नोटाबंदीचा हेतू चांगला होता; परंतु तो फसला असे म्हणता येईल. मध्यमवर्गीय नागरिकांच्या व्यवहारावर नोटाबंदीने फारसा परिणाम झाला नाही. देशाच्या आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने डिजिटल पाऊल योग्य आहे; परंतु त्याचा सामान्यांना अद्याप फायदा नाही. केवळ काही क्षेत्रांतील भ्रष्टाचारावर त्यामुळे नियंत्रण आले आहे; परंतु ते नोटाबंदीने नाही, तर पॅन कार्ड लिंक केल्यामुळे झाले आहे. नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाल्याने काळ्या पैशांचे व्यवहार कमी झाले असे म्हणता येईल.
- महेश सावंत, सी. ए. (ठाणे)

छोटे शेतकरी-मजुरांची अडचण
कीटकनाशके, बी-बियाणे यांच्या खरेदीबरोबरच आता भाताची विक्री करताना नोटाबंदीचा परिणाम जाणवत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे व्यवहार रोखीनेच होत असतात. भाताची विक्री केल्याबरोबर कर्जदारांचे देणे देता येत नाही. सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. कॅशलेश व्यवहार कसे करायचे, याची माहिती सामान्य शेतकऱ्यांना अद्याप नाही.  
- कैलास पिंगळे, प्रगतिशील शेतकरी (अलिबाग)

पैशांची सुरक्षा वाढली 
आपल्याकडे रोख व्यवहाराला अधिक प्राधान्य दिले गेल्यामुळे अचानक नोटाबंदी लागू झाल्याने पहिल्यांदा सर्व व्यवहार थंडावले. त्यानंतर खर्चावर मर्यादा आली आहे. डिजिटलचा पर्याय जास्त सोईस्कर वाटत आहे. डिजिटल व्यवहारामुळे पैसे लुटण्याचा धोका टळला आहे. नोटाबंदीमुळे मुक्त बाजार बंद झाला आहे. सर्व पैशांचे व्यवहार पारदर्शक झाले आहेत. सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहेत. नोटाबंदी झाल्याने व्यवहार रोख होत असल्यामुळे पैशांची सुरक्षा वाढली असल्याचेच दिसत आहे.
- कीर्ती राणा, घाऊक व्यापारी (नवी मुंबई)

सर्वसामान्यांचे नुकसान झाले
नोटाबंदीने सुरुवातीला त्रास झाला. सर्वसामान्यांचे नुकसान झाले. काळ्या पैशांच्या व्यवहारांवर नियंत्रण आले नाही. वर्षभरानंतरही किती काळा पैसा जमा झाला आहे त्याचा कोणताही पुरावा सरकारकडे नाही. अर्थात, डिजिटल पर्याय त्यावरील उत्तर असू शकते; परंतु ५० टक्‍क्‍यांहून अधिक नागरिक अशिक्षित असलेल्या आपल्या देशात तो पर्याय पण भ्रष्टाचाराला आपलेसे करू शकतो. म्हणूनच डिजिटलचा पर्याय काहींसाठी सोईचा आहे; परंतु इतरांसाठी नाही.
- मानसी फाटक, वकील (पनवेल)

वृत्ती बदलायला हवी 
नोटाबंदीमुळे सुरुवातीचे दोन महिने प्रचंड त्रास झाला. नोटाबंदीने काळ्या पैशांच्या व्यवहारांवर नियंत्रण आलेले दिसत नाही. भ्रष्टाचार ही एक वृत्ती आहे. जोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत डिजिटल व्यवहार आणि नोटाबंदीसारखे पर्याय पूर्णपणे सफल होणार नाहीत. डिजिटल पर्याय सोईचा आहे, वेळ वाचतो; परंतु त्यामुळे द्यावे लागणारे जास्तीचे पैसे नागरिकांच्या खिशातून जातात. बॅंका सरळधोपटपणे सर्व सेवांच्या बदल्यात जास्तीचे पैसे लागू करते.
- शुभदा कासले, व्यावसायिक (पनवेल)

सुरुवातीला अनेक अडचणी
नोटाबंदीमुळे फटकाच बसला. अनेकांच्या व्यवसायाला खीळ बसली आहे. नोटाबंदीमुळे कॅशलेस व्यवहार करणे सोपे झाले एवढी मात्र जमेची बाजू म्हणता येईल. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. नुकसानही सहन करावे लागले. त्यानंतर जीएसटी लागू झाला आणि नुकसान आणखी वाढले. आता मात्र व्यवहार सुरळीत होत असून नुकसान भरून निघत आहे.
- अविनाश मुनेश्‍वर, हॉटेल व्यावसायिक (नेरूळ)

व्यवसायावर परिणाम 
मॉल संस्कृतीमुळे किरकोळ धंद्यांमध्ये आधीपासूनच मंदी आहे. नोटाबंदीनंतर व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला आहे. ज्या व्यावसायिकांचे भाड्याचे दुकान आहे, त्यांना तर परवडतच नाही. व्यवहार डिजिटल व्हावेत म्हणून स्वाईप मशीनचा पर्याय ठेवण्यात आला होता; परंतु किरकोळ खरेदीसाठी महिन्यातून एखादा ग्राहक कार्ड वापरणारा येतो. त्यामुळे मशीनचे भाडे किंवा २ टक्के कमिशन परवडत नाही. नोटाबंदीनंतर काही प्रमाणात फटका बसला हे नक्की.
- किरण जोशी, व्यावसायिक, आशापुरा ट्रेडर्स (नेरूळ)

मच्छी व्यवसायावर परिणाम नाही 
मच्छी व्यवसाय रोखीनेच चालतो. एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या असाच प्रकार असल्याने नोटाबंदीचा मोठा फटका व्यवसायाला बसला नव्हता. मच्छीचा व्यवसाय चालतो तिथली परिस्थिती डिजिटल व्यवसाय करण्यासारखी नसल्याने त्याचा उपयोग तसा कमीच होतो. सुरुवातीला प्रयत्न करूनही तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा ठोस असा कोणताही परिणाम मच्छीविक्रेत्यांवर झाला नाही.  नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैशाच्या नियंत्रणासाठी घेण्यात आला होता; पण त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही.
- बुधाजी परशे, मासळी व्यावसायिक (कळंबोली)