मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

'समृद्ध जीवन'बाबत मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

'समृद्ध जीवन'बाबत मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन
मुंबई - समृद्धी जीवन समूह फसवणूक प्रकरणाबाबत गुन्हे दाखल केले असून, एमपीआयडी (महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर) कायद्यानुसार संबंधित मालमत्तेची विक्री करण्यात येणार आहे व ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

समृद्धी जीवन समूह आणि त्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या संदर्भात सदस्य सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की संबंधित प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपत्ती जप्त करण्याचे काम झाले आहे. एमपीआयडी कायद्यानुसार विक्री करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. सीआयडी न्यायालयीन आदेशानुसार प्रस्ताव राज्य शासनास देणार आहे. त्यास शासन तात्काळ मान्यता देऊन मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यासंदर्भातील कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.