शिवसेनेची तावडेंविरोधात हक्कभंगाची सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाला कुलपतींनी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासंदर्भात दिलेली अंतिम मुदत विद्यापीठाला पाळता आली नाही, त्यामुळे निकाल रखडल्याबद्दल राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात विधान परिषदेत मंगळवारी (ता.1) हक्कभंगाची सूचना दाखल केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला सरकारविरोधात हक्कभंग दाखल करता येत नाही, असा मुद्दा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी मांडल्यामुळे सभागृहात काही वेळ पेच उभा राहिला होता.

विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल परब हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना दाखल करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी निवेदन वाचून दाखवले. मात्र, त्यास कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आक्षेप घेत हरकतीचा मुद्दा मांडला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना मंत्र्यावर हक्कभंग सूचना दाखल करण्याबाबतचा नियम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांनी निदर्शनास आणून दिला.
हक्कभंगाची सूचना स्वीकारायची की नाही याचाही निर्णय राखून ठेवण्यात येत आहे. संबंधित मंत्र्याकडून या सर्व प्रकरणाचा खुलासा मागवून घेण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.