पांढऱ्या हत्तीला माहूत मिळाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - सिडकोसाठी पांढरा हत्ती ठरलेले वाशी येथील भव्य प्रदर्शन केंद्र चालवण्यासाठी अखेर कंत्राटदार मिळाला आहे. राहुल केबल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एमएम ॲक्‍टिव्ह एससीआय टेक कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीवर हे प्रदर्शन केंद्र चालवण्यास देण्यात येणार आहे. कंत्राटदारांकडून सिडकोला वर्षाकाठी पाच कोटी रुपये भाडे मिळणार आहे. कंत्राटदाराला प्रदर्शन केंद्र चालवण्याबरोबरच त्याच्या देखभालीचा खर्चही करायचा आहे.

या प्रदर्शन केंद्राचे उद्‌घाटन सप्टेंबर २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे प्रदर्शन केंद्र चालवण्यासाठी सिडको कंत्राटदाराचा शोध घेत होती. 

वाशी सेक्‍टर ३० येथे सुमारे ७.४२ हेक्‍टर जागेवरील ४१ हजार ९०५ चौरस मीटरवर हे प्रदर्शन केंद्र आहे. केंद्राच्या २४ हजार २८८ चौरस मीटरवर कॉन्फरन्स हॉल आणि ११ हजार ९६५ चौरस मीटरवर कलादालने तयार करण्यात आले आहेत. पाच हजार चौरस मीटरवर दोन प्रदर्शन दालने तयार करण्यात आली आहेत. 

या प्रदर्शन केंद्राचे काम पाच वर्षे सुरू होते. त्यासाठी सिडकोने सुमारे २६० कोटी रुपये खर्च केले; मात्र २०१४ पासून आजपर्यंत एकही कंत्राटदार सिडकोच्या अटींची पूर्तता करू शकत नसल्याने हा पांढरा हत्ती सिडकोला सांभाळावा लागत होता. सिडकोने हे प्रदर्शन केंद्र चालवण्यासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवली होती; मात्र कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. 

काही दिवसांतच करार
पुण्यातील राहुल केबल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एमएम ॲक्‍टिव्ह एससीआय टेक कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रदर्शन केंद्र चालवण्यात रस आहे. ते चालवण्यासाठी कंत्राटदाराला ९ वर्षांची मुदत दिली आहे. सिडकोला त्यातून ५ कोटी रुपये मिळणार आहेत. काही दिवसांतच कंत्राटदाराशी सिडको करार करणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली.

Web Title: mumbai news display center