भाजपचे मोदी-मोदी, तर शिवसेनेचे 'चोर-चोर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मोदी कोण ते समजतील
शिवसेनेकडून "चोर है चोर है' अशा दिलेल्या घोषणांचा खुलासा करताना शिवसेना नगरसेवकांनी सांगितले, की आम्हाला वाटले मोदी म्हणजे ललित मोदी. त्यामुळे "चोर चोर' अशा घोषणा दिल्या. यासंदर्भात भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले, की आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यामुळे असे प्रकार करत आहेत. त्यांना मोदी कोण हे काही दिवसांतच समजेल.

महापालिकेत भाजप-शिवसेनेचे घोषणायुद्ध; नेत्यांसमोरच वाद चव्हाट्यावर
मुंबई - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईचा पहिला हप्ता बुधवारी महापालिकेला सुपूर्द करण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना-भाजपमधील धुमसणारा वाद दोन्ही पक्षांतील नगरसेवकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

महापालिका मुख्यालयाबाहेर भाजपच्या नगरसेवकाला झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर या गोंधळाची सुरवात झाली. त्यानंतर सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी "मोदी-मोदी' असा गजर केला, तर शिवसेनेने "चोर है चोर है' असा घोष करत उत्तर दिले. या गोंधळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सभागृहात उपस्थित झाले. या दोघांनीही भाषणांमध्ये एकमेकांना चिमटे काढले.

जीएसटी लागू झाल्यामुळे महापालिकेची जकात बंद झाली आहे. त्या मोबदल्यात राज्य सरकारकडून पालिकेला अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा पहिल्या महिन्याचा 647 कोटी 34 लाखांचा हप्ता महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्याकडे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सुपूर्द केला.

या वेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भाजपचे नगरसेवक ऍड. मकरंद नार्वेकर यांना महापालिका मुख्यालयाखाली शिवसेनेने धक्काबुक्की केली. त्यानंतर सभागृहात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. "पैसा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा' अशी घोषणा शिवसेनेने केली. हा धागा पकडून "हा पैसा बापाचा नाही, तर तुम्हाला आम्हाला निवडून दिलेल्या जनतेचा आहे,' असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला. या कोटीला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, "तुम्ही देताय आम्ही घेतोय अशी परिस्थिती नाही, तर देणारी जनता आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात म्हणजे गुजरातमध्येही जीएसटीवरून आंदोलन सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदी कोण ते समजतील
शिवसेनेकडून "चोर है चोर है' अशा दिलेल्या घोषणांचा खुलासा करताना शिवसेना नगरसेवकांनी सांगितले, की आम्हाला वाटले मोदी म्हणजे ललित मोदी. त्यामुळे "चोर चोर' अशा घोषणा दिल्या. यासंदर्भात भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले, की आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यामुळे असे प्रकार करत आहेत. त्यांना मोदी कोण हे काही दिवसांतच समजेल.