दिव्यात ‘गर्दी’ वाढतेय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

दिवा - मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबई, पनवेलमधील घरांचे भावही गगनाला भिडू लागल्याने मध्यमवर्गीयांनी आपला मोर्चा ठाण्याच्या पुढे वळवल्याचे निदर्शनास येत आहे. साडेचार ते पाच लाखांत मनाजोगती घरे मिळण्याच्या ‘दिवास्वप्नांना’ भुलून सर्वसामान्यांनी दिवा, कोपर, ठाकुर्ली येथील घरांना पसंती देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या या उपनगरांमधील बांधकामांवर कोणाचाही अंकुश न राहिल्याने येथील बेकायदा बांधकामांत वाढ होत आहे. परिणामी १९९० पर्यंत चार ते पाच हजारांच्या घरात असलेली येथील लोकसंख्या पाच ते आठ लाखांवर पोहचली आहे.

दिव्यातील मातार्डी, आगासन, बेतवडा या गावांची लोकसंख्या जेमतेम चार ते पाच हजारांवर होती. दिव्याचा समावेश ठाणे महापालिकेत केल्यानंतर तेथे नागरी सुविधा उपलब्ध झाल्या. त्याच तुलनेत येथील बेकायदा बांधकामेही वाढू लागली. दिवा स्थानकात कोकणातील गाड्यांना थांबा असल्याने कोकणातील बहुतांश नागरिकांनी येथेच स्थायिक होण्यास सुरुवात केली. 

रुग्णालय, पोलिस ठाणे, शाळा, महाविद्यालये, मुलांसाठी उद्याने, खेळण्यासाठी मैदान, करमणुकीसाठी चित्रपटगृह अशा सुविधा, तसेच २४ तास पाणी उपलब्ध नसतानाही केवळ परवडणारी घरे उपलब्ध असल्याने मध्यमवर्गीय नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर घरे घेत आहेत. घरे घेताना इमारत बेकायदा आहे किंवा नाही याची पडताळणीही करताना दिसत नाहीत.  

रेल्वेस्थानकावरही ताण
वाढत्या लोकसंख्येचा परिणाम दिवा रेल्वेस्थानकातही दिसून येत आहे. या रेल्वेस्थानकातून रोज एक लाख २५ हजार प्रवासी प्रवास करतात. दिव्यातून मुंबईत जाण्यासाठी रेल्वेव्यतिरिक्त इतर मार्ग उपलब्ध नाही. येथील नागरिकांना कल्याण शिळ फाटा मार्गाचा वापर करावा लागतो. मुंबई - दिवा - रोहा अशा दिवसातून पाच गाड्या कोकणात जातात. दिवा येथून वसईला रोज तीन गाड्या जातात. त्यामुळे स्थानकाचे रोजचे उत्पन्न सहा ते सात लाख रुपये आहे. दिवा स्थानकातून मुंबईकडे कामानिमित्त जाताना व येताना या परिसरातून लाखोंच्या संख्येने प्रवासी सकाळ, संध्याकाळ लोकलने प्रवास करतात; शिवाय दिवा परिसरात स्वस्त घर मिळत असल्याने नागरिकांची इतर राज्यांतूनही ये-जा सुरू असते.

दिव्यातील गर्दीचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. राज्य सरकार व महापालिकेच्या भूखंडावर असलेली बेकायदा बांधकामे तोडून सरकारी कार्यालये सुरू व्हायला हवीत. रेल्वे स्थानकावरही वाढलेल्या गर्दीचा परिणाम दिसत आहे. 
- ॲड्‌. आदेश भगत, दिवा प्रवासी संघटना

कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळत असल्याने येथे स्थायिक होण्यास नागरिक पसंती देत आहेत. या गर्दीचा स्थानिकांनाही त्रास होत आहे. 
- ओमकार लाड, नागरिक