एक महिन्याचे वीजबिल पावणेचार लाख! आमदारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 14 जुलै 2017

एवढी मोठी चूक करून एका नागरिकाला दिलेल्या त्रासाचे उत्तर मात्र या अभियंत्यांकडे नव्हते.मे 2017चे पाटील यांच्या वीज बिल 450 रुपये आणि  87 युनिट  होते. मात्र दुसऱ्या महिन्यात म्हणजे जून 2017 ला तीन लाख सहा हजार तीनशे सत्तर रुपये वीज बिल आणि 18786 युनिट पडल्याचे वीज बिलामध्ये दाखवण्यात आले आहे.

डोंबिवली - वीजग्राहकाला एक माहिन्याचे तब्बल तीन लाख रुपये बिल पाठवून जबरदस्त शॉक देणाऱ्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारभार सुधारण्याच्या सूचना आमदार सुभाष भोईर यांनी दिल्या.

महावितरण आणि वीजग्राहक यांच्यात वाद न झाला असा एकही दिवस नाही. डोंबिवली जवळील काटई येथील मुकुंद दत्तू पाटील यांना जून 2017 चे वीज बिल चक्क तीन लाख सहा हजार 370 रुपये पाठविण्यात आले आहे. यापूर्वी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा नगर येथे राहणारा नाका कामगार राजू शिंदे यांना एका महिन्याचे 62 हजार रुपये वीज बिल देण्यात आले होते. `फोल्टी मीटर` असे वीज बिलात लिहून आपली जबाबदारी झटकणाऱ्या या महावितरण कंपनीने दिलेल्या या शॉकमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अशा अनेक  तक्रारी आल्याने आमदार सुभाष भोईर यांनी याकडे लक्ष देत नागरिकांना योग्य वीज पाठविणे महावितरण कंपनीची जबाबदारी असून लवकरच यात सुधारणा करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

वीजबिल आणि महावितरण कंपनी संबधित समस्याचे निवारण करण्यासाठी `महावितरण आपल्या दारी` कार्यक्रम शुक्रवारी पिंपळेश्वर मंदिरात पार पडला. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर नागरिकांच्या भेटीला आले होते. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश म्हात्रे , नगरसेविका प्रेमा म्हात्रे , शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी,आदी मान्यवर व तक्रारदार नागरिक  उपस्थित होते.  यावेळी उपस्थित असलेले महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काकडे, कार्यकारी अभियंता के. एस.बेल्ले यांना आमदार भोईर यांनी चांगलेच झापलेव सर्व चुका सुधारण्यास सांगितले.

एवढी मोठी चूक करून एका नागरिकाला दिलेल्या त्रासाचे उत्तर मात्र या अभियंत्यांकडे नव्हते.मे 2017चे पाटील यांच्या वीज बिल 450 रुपये आणि  87 युनिट  होते. मात्र दुसऱ्या महिन्यात म्हणजे जून 2017 ला तीन लाख सहा हजार तीनशे सत्तर रुपये वीज बिल आणि 18786 युनिट पडल्याचे वीज बिलामध्ये दाखवण्यात आले आहे. मे महिन्याच्या वीज बिलामध्ये `फोल्टी मीटर` असे लिहून महावितरण कंपनीने आपली हुशारी दाखवली. प्रत्यक्षात याची जबाबदारी त्या वीजग्राहकावर टाकली गेली. अशा प्रकारे `मीटर फोल्टी`लिहून जास्तीचे वीज बिल पाठवून कंपनी ग्राहकांची लुट करत असल्याची ओरड सुरू झाली आहे.