डॉ. परोपकारींना बडतर्फ करा!  

डॉ. परोपकारींना बडतर्फ करा!  

नवी मुंबई - महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांना बडतर्फ करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक गावडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई न केल्यास प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. परोपकारींविरोधात सुरू असलेल्या विभागीय चौकशीत ते दोषी आढळले असूनही आयुक्त डॉ. एन. रामास्वामी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई का करत नाहीत, असा संतप्त प्रश्‍न गावडे यांनी बैठकीत विचारला. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सांभाळणारे डॉ. दीपक परोपकारी यांच्यावरच विभागीय चौकशीत दोषी असल्याचा ठपका ठेवला असेल, तर ते कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचा गाडा कसा हाकणार, असा प्रश्‍न गावडे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत विचारला. परोपकारींवर कारवाई का करत नाही, यावरून त्यांनी प्रशासननावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. प्रशासनाकडून मिळालेल्या परोपकारींच्या चौकशी अहवालातील वादग्रस्त मुद्दे त्यांनी सभागृहात मांडले. परोपकारींचा राजीनामा प्रशासन एकीकडे मंजूर करते; तर नंतर तेच प्रशासन त्यांचा पुन्हा नोकरीवर येण्यासाठी अर्ज लोकहिताचे कारण देऊन स्वीकारते. परोपकारी असे कोणते लोकहिताचे काम करणार होते, या तत्कालीन आयुक्तांनी मारलेल्या शेऱ्यावर त्यांनी आक्षेप घेतला. परोपकारी पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या वेतनातील ३३ लाख त्यांच्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन आयुक्तांच्या वेतनातून वसूल करावे, अशीही मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे आरोप सिद्ध झाल्यानंतरही आयुक्त त्यांना पाठीशी का घालत आहेत, असे विचारून यावरून प्रशासनाच्या कारभारावर संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. परोपकारींपेक्षा अधिक सक्षम अधिकारी महापालिकेत आहेत. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्याची जोरदार मागणी गावडे यांनी केली. आरोग्य विभागात सध्या वैद्यकीय अधिकारी, अपघात वैद्यकीय अधिकारीपदावर गेली अनेक वर्षे एकाच कार्यालयात काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली केल्यास आरोग्य विभागाचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

आरोग्य विभागाचा निधी परत गेला 
महापालिकेच्या आरोग्य विभागाला राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांसाठी येत असलेला कोट्यवधींचा निधी वापराविना परत गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक गावडे यांनी केला. २०१४-१५ मध्ये तीन कोटी ७५ लाख, २०१५-१६ ला २६ लाख, २०१६-१७ वर्षातील दोन कोटी वापराविना परत गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तसा कोणताच निधी परत जात नाही. तो निधी पुन्हा जमा होतो, असे स्पष्टीकरण डॉ. दीपक परोपकारी यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com