"ती' बोट दोन दिवस पाकिस्तानात होती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - दीड हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आलेली बोट दोन दिवस पाकिस्तानात तळ ठोकून होती, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे. या बोटीचा मास्टर देशातील चार व्यक्तींच्या संपर्कात होता. त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई - दीड हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आलेली बोट दोन दिवस पाकिस्तानात तळ ठोकून होती, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे. या बोटीचा मास्टर देशातील चार व्यक्तींच्या संपर्कात होता. त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

"एमव्ही हेन्‍री' या व्यापारी बोटीतून शनिवारी 3500 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या बोटीतील आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले होते. या बोटीचा मास्टर हा मुंबईतील दोन आणि कोलकता व एक तमिळनाडूतील प्रत्येकी एका व्यक्तीच्या संपर्कात होता. या माहितीवरून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. "हेन्‍री' ही बोट दोन दिवस कराची बंदरात तळ ठोकून होती. त्या वेळी त्यातील दोन व्यक्तीही तेथे उतरल्याची माहिती चौकशीत सुरक्षा यंत्रणांना समजली आहे.

पोरबंदरच्या समुद्रात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती "नॅशनल टेक्‍निकल रिसर्च ऑर्गनायझेशन'ने 27 जुलैला दिली होती. त्यानंतर नौदल, तटरक्षक दल, गुप्तचर संस्था, स्थानिक पोलिस व सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना अटक करण्याच्या हालचाली केल्या होत्या. शनिवारी एका बोटीवरील हालचाली संशयास्पद आढळल्याने तटरक्षक दलाच्या राज्य मुख्यालयातून त्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यानंतर छोट्या बोटीच्या साह्याने या बोटीवर जात पोलिसांनी अमली पदार्थाचा साठा पकडला. सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी "हेन्‍री' ही बोट नेटवर्कवर स्वतःची ओळख "प्रिन्स-2' अशी दाखवत होती, तर मरिन ट्रॅफिक यंत्रणेवर या बोटीने "अल सादिक' अशी ओळख दाखवली होती.