उंदरांनीच खाल्ले अमली पदार्थ

अनिश पाटील
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मुंबई - महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) जप्त केले 34 किलो अमली पदार्थ गायब झाल्याप्रकरणी त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे "अ' वर्गीकरण करून या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वांत हास्यास्पद बाब म्हणजे चौकशीत सीमा शुल्क गोदामाच्या अधिकाऱ्यांनी उंदरांनी अमली पदार्थ खाल्ल्याचा दावा केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत 3.4 कोटी रुपये आहे.

सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक पुरुषोत्तम निमजे हे 2014 मध्ये शिवडी येथील नानावटी गोदामाचे प्रभारी होते. त्याच्या तक्रारीवरून शिवडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. शिवडी पोलिस ठाण्याच्या जवळच के स्ट्रीट येथे हे नानावटी गोदाम आहे. या गोदामात सीमा शुल्क विभाग व "डीआरआय'सारख्या केंद्रीय संस्थांनी जप्त केलेला माल न्यायालयीन परवानगीने ठेवला जातो. त्यामुळे "डीआरआय'च्या 2011च्या एका गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या "केटामाइन'ची 20 खाकी पाकिटे सील करून येथे ठेवली होती. 17 जून, 2014 ला "डीआरआय'चे अधिकारी परमार व अतिरिक्त दंडाधिकारी काळे "एनडब्ल्यूएच/04/2011' व "एनडब्ल्यूएच/5/2011' या क्रमांकांची "केटामाइन'ची पाकिटे नेण्यासाठी गोदामात आले. त्यानुसार त्यांना 20 पाकिटे सुपूर्त करण्यात आली. त्यातील 13 पाकिटे व्यवस्थित होती. मात्र उर्वरित सात पाकिटांमधील "केटामाइन'चे वजन कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत पडताळणी केली असता "केटामाइन'चे सील व्यवस्थित होते. पण ही सात पाकिटे खालून फाटलेली असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पडताळणीत या पाकिटांमधील 34.13 किलोग्रॅम "केटामाईन' गायब असल्याचे लक्षात आले.

जागतिक बाजारपेठेत या "केटामाईन'ची किंमत तीन कोटी रुपये आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे पाकिटे खालून कुरतडलेली असल्यामुळे उंदरांनी खाल्ल्याचा दावा गोदामातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासात हाती काही लागले नसून त्यामुळे तपास बंद केला आहे. या बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर नावगे यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी "अ' वर्गीकरण (ए समरी) करून तपास बंद करण्यात आला आल्याचे त्यांनी सांगितले.

अंधेरी, सांगलीतून जप्त
अंधेरीतून दोन जून 2011 मधून 200 किलो "केटामाइन हायड्रोक्‍लोराइड' जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तीन जून, 2011 ला या प्रकरणी सांगली येथे छापा टाकून दोन कोटी रुपयांचे "केटामाइन' जप्त करण्यात आले होते. याच कारवाईत जप्त करण्यात आलेले "केटामाईन' गायब झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली.