एल्फिन्स्टनचा रेल्वे पूल लष्कर बांधणार - निर्मला सीतारामन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन रोड व परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या जागेची पाहणी मंगळवारी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नवीन पुलाच्या आराखड्याविषयी त्यांनी माहिती घेतली. या पुलासह करी रोड आणि अंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल लष्करामार्फत 31 जानेवारी 2018 पर्यंत बांधण्यात येतील, अशी घोषणा सीतारामन यांनी या वेळी केली.

सीतारामन म्हणाल्या की, सैन्याकडून लष्करी कारणासाठी; तसेच आपत्तीकाळात अशी बांधकामे केली जातात. एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीची दुर्घटना धक्कादायक होती. या दुर्घटनेत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने संरक्षण मंत्रालयाला केलेल्या विनंतीनुसार लष्कर हे काम करणार आहे.

नागरी कारणासाठी लष्कराने बांधकाम करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य सरकार काही उपाययोजना करत आहेत. नेहमीच्या कार्यपद्धतीने येथे नवीन पूल बांधण्यास बराच वेळ लागेल.

सैन्याकडे अशा प्रकारचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे तंत्रज्ञान असल्याने संरक्षण मंत्रालयाला हे काम करण्याची विनंती करण्यात आली होती. ती मान्य झाली आहे. गोयल म्हणाले की, एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर रेल्वेने उपनगरी स्थानकांची पाहणी करून सुरक्षाविषयक पाहणी केली. त्यानुसार उपाययोजना; तसेच आवश्‍यक सुधारणांबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालय तीन स्थानकांवरील पादचारी पुलांचे काम करणार आहे.

सीतारामनजी, लष्कराला सार्वजनिक कामे करण्यासाठी नाही, तर युद्धासाठी प्रशिक्षण दिले जाते. नागरी कामांसाठी लष्करी स्रोतांचा वापर करू नका.
- कॅ. अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री, पंजाब

आपत्कालीन परिस्थितीत लष्कराला पाचारण करण्याचा उपाय शेवटी केला जातो. पण आता काही झाले तरी प्रथम लष्कराचीच मदत मागितली जात असल्याचे दिसत आहे.
- उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्‍मीर

मुंबईतील पूल उभारणीसाठी लष्कराला बोलाविले जाते, यावरूनच शिवसेना-भाजप सरकारचे अपयश दिसून येते. आता मुंबईतील खड्डे बुजविण्याचे काम लष्कराला दिले जाणार नाही, अशी आशा आहे.
संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई कॉंग्रेस