पुलावरून रांगेत आस्तेकदम!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर तीन दिवस सुटीमुळे शांतता होती. कार्यालयीन कामाच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रवाशांनी त्या भीतीदायक आठवणींना दूर ठेवत पुन्हा या पुलाची वाट धरली. मात्र, गर्दी टाळण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात प्रत्येक प्रवासी आस्तेकदम टाकत होता.

मुंबई - एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर तीन दिवस सुटीमुळे शांतता होती. कार्यालयीन कामाच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रवाशांनी त्या भीतीदायक आठवणींना दूर ठेवत पुन्हा या पुलाची वाट धरली. मात्र, गर्दी टाळण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात प्रत्येक प्रवासी आस्तेकदम टाकत होता.

परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या एल्फिन्स्टन दिशेकडील टोकाला चेंगराचेंगरी होऊन 29 सप्टेंबरला दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला; तर 39 प्रवासी जखमी झाले. दुर्घटनेनंतर सलग तीन दिवस सुट्या होत्या. त्यामुळे पुलावर फारशी गर्दी नव्हती. मंगळवारी कार्यालयीन कामाचा पहिलाच दिवस असल्याने सकाळी 9.30 पासूनच पुलावर गर्दी होऊ लागली.

दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ते प्रवाशांना रांगेत चालण्याचे आवाहन करत होते. नागरिकांनीही कटू आठवणी दूर ठेवत पुलाची वाट धरली होती.

मंगळवारी गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने स्थानकात व पुलावर ठिकठिकाणी 50 हून अधिक पोलिस तैनात होते. लोकलमधून स्थानकात आणि पुलावरून स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांच्या रांगा लावण्याचे कामही पोलिसच करीत होते. त्यामुळे कोणत्याही गोंधळाविना गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होत होते.

दुर्घटनेनंतरच जाग का?
रांगेतून प्रवाशांना कोणत्याही धक्काबुक्कीशिवाय पुलावरून चालणे शक्‍य झाले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पोलिसांच्या या उपायावर समाधान व्यक्त केले. काहींनी मात्र दुर्घटनेनंतरच प्रवाशांना जाग येते का, असा प्रश्‍न उपस्थित करीत संताप व्यक्त केला. रांगेची शिस्त प्रत्येक स्थानकात कायमस्वरूपी सुरू राहिली, तर दुर्घटना टाळता येतील, अशी चर्चाही प्रवाशांत सुरू होती.