सीसी टीव्हीचे चित्रीकरण तपासणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील कारणे शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. या पुलावर एकच सीसी टीव्ही कॅमेरा आहे. त्यामध्ये दुर्घटना झालेल्या ठिकाणचे चित्रीकरण झाले आहे. हे चित्रीकरण तपासून चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याचा शोध घेतला जाणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंचीही पोलिस तपासणी करणार आहेत.

पश्‍चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारे एल्फिन्स्टन स्थानक आहे. या परिसरात कंपन्यांची कार्यालये असल्याने नेहमी गर्दी असते.

स्थानकाच्या पश्‍चिमेला जाण्यासाठी दोन पूल आहेत. एक पूल फुलमार्केटकडे, तर दुसरा एसटी डेपोच्या दिशेने जातो. फुलमार्केट आणि काही कॉपोरेट कंपन्यांमधील कर्मचारी हे दुर्घटना झालेल्या पुलाचा वापर करतात. सकाळच्या वेळेस तेथे प्रचंड गर्दी असते. पादचारी पुलाजवळील तिकीट घराजवळ एक सीसी टीव्ही कॅमेरा आहे. प्राथमिक माहितीनुसार, चेंगराचेंगरी सुरू झाली तेथे सीसी टीव्ही कॅमेराच नाही. पुलावरील गर्दीचे काही दृश्‍ये सीसी टीव्हीत कैद झाली आहेत. सीसी टीव्ही आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंची पाहणी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. दुर्घटना झालेल्या ठिकाणचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातून चेंगराचेंगरी कशी सुरू झाली, हे स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे.

"समीप' सायडिंगला
दोन वर्षांपूर्वी प्रवाशांनी डोंबिवलीत रेल रोको केला होता. या आंदोलनानंतर 2016 मध्ये लोकल घटनांची माहिती प्रवाशांना मिळावी, यासाठी रेल्वे पोलिसांनी "समीप' ही मेसेजिंग यंत्रणा सुरू केली होती. त्यामुळे दुर्घटना घडल्यास सुमारे सव्वादोन लाख प्रवाशांना आपत्कालीन स्थितीबाबत मेसेज तत्काळ मिळत होते. आजच्या दुर्घटनेचा मेसेजच प्रवाशांना आला नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिस लवकरच एक हेल्पलाईन सुरू करीत असल्याने "समीप'वर मेसेज न आल्याचे समजते.

जवानांनी दाखवली रक्तदानाची तयारी
एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीबाबत माहिती कळताच एनडीआरएफचे सहायक कमांडर आशीषकुमार, अधिकारी विजेंदर दहिया यांच्यासह 35 जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. "एनडीआरएफ'च्या जवानांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. जखमींची संख्या वाढत होती. त्यांना रक्ताची आवश्‍यकता असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले होते. तेव्हा एनडीआरएफच्या जवानांनी रक्तदान करण्याची तयारी दर्शवली; मात्र त्या आधीच रक्ताची व्यवस्था झाल्याचे रुग्णालयातून कळवण्यात आले.

प्रवाशीच झाले स्वयंसेवक
चेंगराचेंगरीनंतर जखमींना प्रथमोपचार देण्याचे काम प्रवासी करत होते. पुलावरील तिकीट घराजवळ बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांचे हात चोळणे, त्यांना तोंडावाटे श्‍वासोच्छ्वास देणे, जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेत ठेवणे ही कामे ते करत होते. प्रत्यक्ष मदत येण्याआधीच प्रवाशांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावण्यास सुरुवात केली होती.